

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या विद्यूत तारांना स्पर्श होऊन एका 37 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास बोडधा या ठिकाणी घडली. अमोल देवराव नाकाडे (वय 37) असे मृत युवकाचे नाव आहे. सदर युवक हा पहाटेच्या सुमारास शेतात शौचास गेला होता.
चिमूर तालुक्यातील बोडधा येथील गावात लगतच्या शेतशिवारात खांब टाकण्यात आले आहे. वण्यप्राण्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी या खांबावरून रात्री विद्यूत प्रवाह सोडतात. त्यामुळे डुकरासारखे वन्यप्राणी मृत्यूमुखी पडतात. रविवारच्या रात्रीला वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरीता विद्यूत करंट सोडण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास अमोल नाकाडे हा युवक शेतात शौचाकरीता गेला होता. त्याचा या विद्यूत तारांशी स्पर्श झाल्याने त्याला जोरदार विजेचा शॉक लागला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी काही शेतकऱ्यांना युवकाचे मृतदेह आढळून आले.भिसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनाकरीता पाठविला.
ज्या ठिकाणी युवक मृत्यूमुखी पडला होता, त्या परिसरात जंगली डूकराचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेने मृत युवकाचा कुटूंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक वाचा :