अकोला : 'या' गावात दसऱ्याला होते दशमुखी रावणाची पूजा; जाणून घ्या काय आहे आख्यायिका | पुढारी

अकोला : 'या' गावात दसऱ्याला होते दशमुखी रावणाची पूजा; जाणून घ्या काय आहे आख्यायिका

अकोला; पुढारी वृत्‍तसेवा : राज्यभरात विजयादशमी म्हणजे दसरा या सणाला रावणाचे दहन करून हा सण साजरा केला जातो. मात्र पातुर तालुक्यातील चतारी पासून जवळच असलेल्या सांगोळा या गावात दसरा या सणाला दशमुखी रावणाच्या मुर्तीची भव्य महापूजा करून दसरा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षीच या गावातील नागरिक रावणाच्या महाकाय मुर्तीची पुजाअर्चा दसऱ्याला मोठ्या मनोभावे करून समाधान व्यक्त करतात. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

रावणाच्या मूर्ती पूजेला सांगोला येथे अनन्यसाधारण महत्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पातूर तालुक्यातील सांगोळा हे रावणाची पूजा करणारे गाव म्हणून राज्याच्या नकाशावर येत आहे हे विशेष! अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात सांगोळा हे गाव जवळपास सहाशे ते सातशे लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात अनेक दशकापासून पुरातन दशमुखी रावणाची मुर्ती गावाच्या उत्तर दिशेला खुल्या जागेत या मुर्तीचे स्थान आहे.

या दशमुखी रावणाच्या मुर्तीची आख्यायिका अशी आहे की, या गावालगत मोठ्या वडाच्या झाडाखाली खोदकाम करत असताना ही मूर्ती या ठिकाणी आढळून आली होती. तेव्हा या मुर्तीला त्या जागेहून हलविण्यासाठी गावकऱ्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. परंतु त्या वेळी या मुर्तीला त्‍या जागेवरून हलवणे कठीण झाल्याने त्या दशमुखी रावणाच्या मुर्तीची त्याच जागेवर स्थापना करण्यात आली असल्याचे येथील जेष्ठ नागरिक सांगतात. तेव्हापासून या दशमुखी रावणाच्या मुर्तीची सांगोळा या गावात दैनंदिन पूजा केली जाते.

या दैनंदिन पुजापाठासह नैवद्य दाखवण्याचे कार्य हरिभाऊ लखाडे हे नित्य नियमाने करीत असतात. विजयादशमी या सणाला संपूर्ण राज्यात रावणाच्या पुतळ्याचे दहन करीत आनंद साजरा केला जातो, मात्र सांगोळा या एकमेव गावात दशमुखी रावणाच्या मुर्तीची विजयादशमी या दिवशी मोठ्या थाटाने महापूजा करून नैवद्य दाखवून विजयादशमी दसरा हा सण साजरा केला जातो.

गावाला येते यात्रेचे स्वरुप 

या दिवशी सांगोळा या गावात हा सोहळा बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने येतात. यावेळी मोठी गर्दी जमत असल्याने या दिवशी या गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. रावणाच्या मूर्तीची पूजा करण्याची प्रथा व परंपरा येथे अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

हेही वाचा :  

Back to top button