ईडी सरकार गुजरातसाठी काम करते : नाना पटोले | पुढारी

ईडी सरकार गुजरातसाठी काम करते : नाना पटोले

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार ईडीच्या धक्क्याने पाडल्यानंतर महाराष्ट्रात सत्तेत आलेली ईडी सरकार केवळ गुजरातच्या हिताकरिता काम करीत आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. देश व राज्यात शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कर्मचारी, मजूर व सर्वसामान्य जनतेच्या महत्वपूर्ण प्रश्नांची उपेक्षा केली जात असल्याचे पटोले अमरावती येथे पत्रपरिषदेत म्हणाले.

राज्याचे कृषी मंत्री मेळघाटच्या दौऱ्यावर असताना त्याच दिवशी तेथे 2 शेतकऱ्यानी आत्महत्या केली. प्रधानमंत्री मोदी यांच्या जन्मदिनी एका शेतकऱ्याने त्यांना पत्र लिहित आत्महत्या केली. त्यामुळे केवळ खोटी आश्वासने देत भाजपा सरकार सत्तेत आले असल्याचे पटोले म्हणाले. आता नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. भाजपाने लोकशाहीची थट्टा चालविली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखविणार असल्याचे पटोले म्हणाले.

काँग्रेसजवळ विकासाचे व्हिजन

भाजप केवळ भीती व भूक वाढविण्याचे काम करीत आहे. मात्र, मागील 70 वर्षात काँग्रेसने देशाचे नाव उज्वल करण्याचे काम केल्याचा गर्व असल्याचे पेटोले म्हणाले. देश व राज्यात काँग्रेस नेत्यांमध्ये नवीन ऊर्जा, नवीन दिशा देण्यासह हरीत क्रांती आणली होती. पुढे देखील देशाला विकासाचे व्हिजन काँग्रेसच देणार आहे. जनतेला देखील भाजपाची जुमलेबाजी माहिती झाल्याचे पटोले म्हणाले. यावेळी माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत व अन्य उपस्थित होते.

Back to top button