अमरावती : जिल्‍हा स्‍त्री रूग्‍णालयाच्या बेबी केअर सेंटरला आग; धुरामुळे चिमुकल्‍यांची प्रकृती गंभीर | पुढारी

अमरावती : जिल्‍हा स्‍त्री रूग्‍णालयाच्या बेबी केअर सेंटरला आग; धुरामुळे चिमुकल्‍यांची प्रकृती गंभीर

अमरावती; पुढारी वृत्तसेवा अमरावती जिल्हा स्री रुग्णालयात बेबी केअर सेंटरला आज (रविवार) अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने दोन पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली. बालकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर बनली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, जिल्हा स्त्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटरमध्ये आज शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीमुळे बेबी केअर सेंटरमध्ये सर्वत्र धूर पसरला. या धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर झाली असून, त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत.

धुरामुळे त्रास होत असलेल्या काही बालकांची प्रकृती गंभीर असून, त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन मुलांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा स्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची माहिती मिळताच अमरावती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने रूग्‍णालयाला भेट दिली. पाच जिल्ह्यांसाठी एकच पालकमंत्री असल्याने कुठल्याही जिल्ह्याचा योग्य विकास आणि नियोजनात्मक कार्य होऊ शकत नाही, असे देखील नाना पटोले म्हणाले.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान बाळांची तातडीने काळजी घेऊन त्यांचे प्राण वाचवले. याबाबत नाना पटोले यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले. नाना पटोले यांच्यासोबत जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेसचे शहर आणि जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :  

Back to top button