अमरावती, पुढारी वृत्तसेवा : निर्गुंतवणुकीच्या नावाखाली केंद्र सरकारने देश विकायला काढल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर यांनी केला. भाकपच्या २४ व्या तीन दिवसीय राज्य अधिवेशनास अमरावती येथील नेमानी इन येथे रविवारी (दि. १८) सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाचे उद्धाटन करताना कौर यांनी केंद्र सरकार विरोधात पेटून उठण्याचे आवाहन नागरिकांना केले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपण शेतकरी आत्महत्यांचे दुख: झेलतो आहे. चुकीच्या धोरणामुळे देशात बिकट आर्थिक समस्या निर्माण केली आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्यास कमी पडत असल्याने रोजंदारी मजूर आत्महत्या करीत आहे. देशात होत असलेल्या एकूण आत्महत्यांमध्ये २५ टक्के रोजंदारी कामगार असल्याचे सरकारच्या क्राईम ब्युरोच्या अहवालातून पुढे आल्याचे कौर यांनी सांगितले.
२०१४ मध्ये सत्ता मिळाल्यापासून मोदी सरकारने अदानी व अंबानी यांना श्रीमंतीच्या उच्च शिखरावर पोहोचवले. जनतेला मिळणाऱ्या सर्व सेवांमध्ये कपात केली जात आहे. शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या योजना, राशन आदी विविध लोकपयोगी योजनांवर नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून हल्ले करण्यास सुरूवात केली. या योजनांमध्ये १० टक्के राज्य तर ९० टक्के वाटा केंद्र सरकारचा होता. मात्र, मोदी सरकारने सामाजिक योजनांचा ४० टक्के वाटा राज्यांवर टाकला आहे. आता तर सामाजिक सेवाच बंद केल्या जात असल्याचे अमरजीत कौर म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रीय सचिव कॉ. भालचंद्र कांगो यांनी देखील सभेला संबोधित केले. यावेळी मंचावर स्वागत समितीचे अध्यक्ष प्रा. साहेबराव विधळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव तुकाराम भस्मे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, नामदेव चव्हाण, कॉ. शिवकुमार गणवीर, आयटकचे राज्याध्यक्ष सि. एन. देशमुख, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले, इत्यादी मंचावर उपस्थित होते.
भव्य रॅलीने अधिवेशनाची सुरुवात
सर्वप्रथम इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अमरजीत कौर यांनी पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात केली. लाल रंगाच्या टी-शर्ट घातलेले स्वयंसेवक सर्वात पुढे, ढोल ताशे तसेच गगणभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रेल्वे स्टेशन, राजकमल चौक, जयस्तंभ चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर रॅलीचा समारोप नेमानी इन येथे करण्यात आला.