राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, राज्यातील शाळांचा निर्णय २ दिवसांत | पुढारी

राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, राज्यातील शाळांचा निर्णय २ दिवसांत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी दिली.

नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मात्र, शाळा सुरू करण्याबाबत येत्या दोन दिवसांत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यात शाळा दिवाळीनंतर सुरू करायच्या की, आता सुरू करायच्या यासंदर्भात निर्णय होईल. त्यासाठी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

राज्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्यास स्थगिती देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे; पण अजूनही काही जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती पाहता धोका कमी झालेला नाही.

शाळा सुरू व्हायला पाहिजेत, असेे सर्वांना वाटत आहे. मात्र, केरळनंतर राज्यातील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा लागेल, असेही बच्चू कडू यांनी यावेळी नमूद केले.

Back to top button