अमरावती जिल्ह्यात चार जणांचा खून, तीन ग्रामीण भागात तर एक अमरावती शहरात

अमरावती जिल्ह्यात चार जणांचा खून, तीन ग्रामीण भागात तर एक अमरावती शहरात
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या विविध भागात एकाच दिवशी चार जणांचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या खुनांच्या घटनांमुळे गुरुवारी (१ सप्टेंबर) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत साबनपुरा परिसरात एका तरुणाची चौकीदाराने खून केला, तर ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धारणीत भावाचा खून झाल्याचे समोर आले आहे. अन्य एका घटनेत महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. तर धामणगाव तालुक्यात जुन्या वैमनस्यातून एकाचा खून करण्यात आल्याची थरारक घटना घडली आहे.

साबणपुरा परिसरात तरुणाचा खून

मद्यधुंद अवस्थेत नेहमीच त्रास देणा-या एका तरुणाला चौकीदाराने काठीने मारहाण करून जीवे मारले. शुभम मनोज गुल्हाणे (वय 25, रा. अंबाविहार, पार्वती नगर) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवार, 31 ऑगस्ट रोजी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साबणपुरा येथील महापालिका व्यापारी संकुलात घडली. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी संशयीत आरोपी चौकीदार विनायक रामचंद्र रायबोले (60, रा. रहाटगाव) याला अटक केली आहे. शुभम हा गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबीयांपासून वेगळा राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे शुभम हा रात्रीच्या वेळी साबणपुरा येथील महापालिका व्यापारी संकुलात झोपायला जावून चौकीदार विनायक रायबोले यांना त्रास देत होता. बुधवारी रात्री शुभम हा मद्यधुंद अवस्थेत महापालिका व्यापारी संकुलात झोपायला गेला असता, चौकीदार विनायक रायबोले यांनी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, शुभमने चौकीदाराशी वाद घातला. या घटनेची माहिती विनायक रायबोले यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, पोलीस पोहोचण्यापूर्वीच विनायक यांनी शुभमला काठीने मारहाण केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने शुभमला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण गुरुवारी सकाळी शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात मृतक शुभमचे वडील मनोज बाबुराव गुल्हाणे (55) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकीदार विनायक रायबोलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

जुन्या वैमनस्यातून धामणगावात एकाची हत्या

जुन्या वादातून पोळा करीच्या दिवशी एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना धामणगाव रेल्वेतील रामगाव गंगाजळी येथे मंगळवारी उघडकीस आली. पोळा सणाच्या दिवशी जुन्या वैमनस्यातून महेंद्र सहारे आणि तुपसुंदरे कुटुंबीयांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला. या वादानंतर प्रज्वल तुपसुंदरे, सतीष तुपसुंदरे, विनोद तुपसुंदरे आणि प्रेमानंद उर्फ कीट्या तुपसुंदरे यांनी महेंद्र भाऊराव सहारे यांच्यावर काठी, चाकू व फरशाने हल्ला केला. या हल्ल्यानंतर सहारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेच्या अनुषंगाने दत्तापूर पोलिसांनी संशयीत आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम 326 अन्वये गुन्हा नोंदविला होता. पण जखमीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी संशयीत आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम 302 अन्वये गुन्हा वाढविला आहे. पुढील तापस सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र बारड करीत आहेत. याप्रकरणात पोलिसांनी प्रज्वल व सतीष तुपसुंदरे या दोघांना अटक केली आहे.

सुसरदा गावात भावाचा खून

धारणी तालुक्यातील सुसरदा गावामध्ये सख्या भावाचा खून केल्याचे उघडकीस आले. मगनसिंग सूर्यवंशी असे मृताचे नाव आहे. या घटनेची तक्रार मृतकाची पत्नी गंगा मगनसिंग सूर्यवंशी हिने पाच दिवसानंतर धारणी पोलिसांत दिली. तिच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी मृताचा भाऊ मंगलसिंग सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल करून केला आहे. सुसरदा गावातील रहिवासी मगनसिंग अर्जुन सिंग सूर्यवंशी व त्याचा भाऊ मंगल सिंग अर्जुन सिंग सूर्यवंशी हे दोघे एकाच ठिकाणी राहत होते. मगनसिंग सुर्यवंशी व त्याची पत्नी गंगा मनगसिंग सुर्यवंशी यांच्यात काही दिवसापूर्वी पती दारू पित असल्यामुळे वाद झाले होते. त्यामुळे ती तिची मुलगी आरुषी हिला घेऊन तिच्या नातेवाईकाकडे गडचिरोली जिल्ह्यातील लालाडोंगरी येथे निघून गेली होती. तर मुलगा स्वस्तिक हा तिच्या वडीलाकडे होता. तर तिचा पती मगनसिंग व मगलसिंग सुर्यवंशी हे एका ठिकाणी राहत होते. 25 ऑगस्ट रोजी दोघेही एका ठिकाणी बसून दारू पित होते. त्यावेळी दोघात वाद झाला आणि मंगलसिंगने मगनसिंगच्या डोक्यावर लाकडी उसळाने मारहाण करून त्याला जखमी केले.

त्यानंतर परिसरातील नागरिकांनी व त्याच्या नातेवाईकांनी मंगनसिंगला उपचाराकरिता परिसरातील सादरबाडी येथे रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर 28 ऑगस्टपर्यंत उपचार झाले. उपचारादरम्यान 28 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्याचा नातेवाईकांनीच अंत्यविधीचा कार्यक्रम पार पाडला. त्यांनतर त्याची पत्नीला नातेवाईक कांता रुजवेल धांडे यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ती सुसरदा गावात पोहोचल्यानंतर तिने तिचा दीर आरोपीची पत्नी हिला या घटनेबाबत विचारले असता तिने तो तुझ्या मुलाला घेऊन कुठेतरी घटनेच्या दिवशी निघून गेला, असे सांगण्यात आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तिला दोघांमध्ये भांडण झाले व त्यामध्ये तुझ्या पतीच्या मृत्यू झाला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे त्यांनी थेट धारणी पोलीस ठाणे गाठून दीर मनगलसिंग विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मंगलसिंग अर्जुनसिंग सूर्यवंशी याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 302 व 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शेतकरी महिलेचा अत्याचारानंतर खून

शेतीच्या बांधावर बैल चारण्यातून झालेल्या वादात एका महिलेवर अत्याचार करण्यात आला. यानंतर आरोपीने दगडाने ठेचून तिचा खून केला. मेळघाटातील धारणी तालुक्यातील बिरोटी या गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मृताच्या पतीच्या तक्रारीवरून संशयीत आरोपीला अटक करण्यात आली. धारणी पोलिसांनी खून व बलात्काराच्या कलमाखाली सचिन उर्फ रम्मू शिवलाल दारसिंभे (वय 26) या संशयीत आरोपीला अटक केली. मेळघाटातील बिरोटी गावात 51 वर्षीय मृत महिलेची शेती आहे. आरोपी सचिनची देखील तेथे शेती आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी 8 च्या आसपास ती महिला शेतात आली. तेथे शेतीच्या बांधावर बैल चारण्याच्या कारणावरून आरोपी सचिन व तिच्यात वाद झाला. त्यादरम्यान, सचिनने शेताच्या धुऱ्यावर तिच्यावर अत्याचार केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रतिकार मोडून काढत संशयीत आरोपीने पीडीतेचा दगडाने ठेचून खून केला.

सायंकाळचे सात वाजल्यानंतर पत्नी घरी न आल्याने तिच्या पतीने शेत गाठले. त्यावेळी परिसरातील शेतकरी मनोज जाधव याने आरोपी सचिन येथून पळत गेल्याची माहिती त्याला दिली. शेताच्या बांधावर पोहोचताच त्याला पत्नी निर्वस्त्र व मृतावस्थेत आढळली. हे दृश्य पाहून तो लगेच गावाकडे धावला. या घटनेबाबत पोलीस पाटलांना कळविले. या घटनेची माहिती मिळताच आयपीएस गौहर हसन व धारणीचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे, पोलीस उपनिरिक्षक रिना सदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिचा मृतदेह रात्री उशिरा धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणला. संशयीत आरोपीचा रात्रीच शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news