चंद्रपूर : भावडांना वाचविताना ११ वर्षीय बहिणीचा बुडून मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : भावडांना वाचविताना ११ वर्षीय बहिणीचा बुडून मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : सावली शहरापासून आसोलामेंढा तलावात बहिण व भावाला वाचविताना 11 वर्षीय बहिणीचा बुडून मृत्यू झाला. तिचा मृतदेह तब्बल 7 किमी अंतरावर मिळाला आहे. काजल मक्केवार (वय 11) असे मृत बहिणीचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील आसोलामेंढा तलावाच्या पाण्याचा पुरवठा सिंचनासाठी केला जातो. तर लागूनच कॅनॉल गेला आहे. महिला या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जातात. शुकवारी (दि.२६) आईच्या मागे व काजलच्या मागे तिचे बहिण व भाऊ गेले होते. चौघेजण कॅनॉललगत खेळत असताना ते पाण्यात उतरले. दरम्‍यान पाण्याच्या प्रवाहामुळे ते बुडायला लागले. ही घटना कपडे धुणाऱ्या काजलच्या लक्षात येताच तिने बहिण व भावाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र ती चारही जणांना वाचवू शकली नाही. यानंतर आरडाओरड झाल्याने दोन व्यक्तींनी धाव घेत उडी घेतली. रोहित अनिल मेडपल्लीवार, अमित अनिल मेडपल्लीवार, राहूल अंकुश मक्केवार, सुश्मिता अंकुश मक्केवार यांना वाचविण्यात यश आले. मात्र तो पर्यंत काजलही दूर अंतरावर वाहून गेली.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन काजलचा शोध घेतला परंतु तिचा पत्ता लागला नाही. त्यानंतरही शोधमोहीम सुरूच होती. अखेर शनिवारी काजलचा मृतदेह घटनास्थळापासून 7 किमी अंतरावर आढळून आला. बहिण भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी बुडून मृत्यू झालेल्या  काजलच्या कुटूंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button