औरंगाबाद : आमदार प्रशांत बंब यांच्याशी अरेरावी; शिक्षकाच्या पत्‍नी विरोधात गुन्हा | पुढारी

औरंगाबाद : आमदार प्रशांत बंब यांच्याशी अरेरावी; शिक्षकाच्या पत्‍नी विरोधात गुन्हा

लासूर स्टेशन; पुढारी वृत्‍तसेवा शिक्षकांसह विविध सरकारी कर्मचाऱ्यांनी नियुक्ती मिळालेल्या गावातच म्हणजे मुख्यालयीच राहावे, यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणे आमदार प्रशांत बंब यांना महागात पडत आहे. राज्यभरातील विविध शिक्षक फोन करून या संदर्भात आमदार बंब यांना जाब विचारत असून, काल एका शिक्षकाच्या पत्नीने आमदार बंब यांना फोन करून अरेरावी केली. हे प्रकरण जोरदार तापले असून, या महिलेविरोधात आता शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आ. प्रशांत बंब यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मुद्दा उचलून धरला होता. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांसह ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आदींनी नियुक्ती मिळालेल्या गावाच्या मुख्यालयीच राहणे अत्यावश्यक आहे, असा आग्रह आ. बंब यांनी विधिमंडळात धरला होता. यावेळी त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना विविध उदाहरणे देखील दिली होती. एवढेच नव्हे तर अनेक शिक्षक, शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता खोटी घरभाडे बिले सादर करून शासनाची फसवणूक करीत असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.

यानंतर राज्यभरातील शिक्षकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. काही शिक्षकांनी तर या अनुषंगाने आ. बंब याना फोन करून त्याबाबत जाबही विचारला होता. अशाच एका शिक्षक पत्नीने फोन करून आ. बंब यांना अरेरावी करीत अर्वाच्च भाषेत त्यांच्याशी संवाद साधला. सुमारे ३४ मिनिटांच्या या संवादात सदरील महिलेने आ. बंब यांना अनेक ठिकाणी अरे- तुरे अशी भाषा वापरून ‘तू काय आहेस, आम्हाला माहित आहे. तुझ्याबाबत आम्ही गुगलवर सर्च केले आहे’, अशा स्वरूपाची भाषाही वापरली.

विशेष म्हणजे आ. बंब यांना जाब विचारणाऱ्या या महिलेने या संवादात बहुतांश वेळा त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. त्या शिक्षक पत्नीविरोधात गंगापूर-खुलताबाद या आ. बंब यांच्या मतदारसंघात संताप व्यक्त होत असून, रात्री उशिरा या अनुषंगाने लासूर स्टेशनच्या सरपंच मीना पांडव यांनी त्या महिलेविरोधात शिल्लेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार रात्री अकरा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button