जन्मजात शिशु मृत्यूप्रकरणी विडुळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सात जणांवर कारवाई | पुढारी

जन्मजात शिशु मृत्यूप्रकरणी विडुळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सात जणांवर कारवाई

उमरखेड,पुढारी वृत्तसेवा : विडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (दि,  १९ ) ऑगस्‍ट रोजी अधिकारी व कर्मचारी हजर नसल्यामुळे एका महिलेची रुग्णालयाच्या वरांड्यात प्रसुती होऊन नवजात शिशु चा मृत्यू झाला. सदर घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आदेश काढून दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविकेची सेवा समाप्ती केली. तर तीन आरोग्य सहाय्यकासह औषध निर्माण अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व विडूळ येथील वैद्यकीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या घटनेमुळे आरोग्य विभाग प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दि. १९ ऑगष्ट रोजी प्रा. आ. केंद्र विडूळ येथे सायंकाळी पाचच्या दरम्यान टाकळी येथील शुभांगी सुदर्शन हापसे ही गरोदर महिला प्रसूतीकरिता आली. परंतु त्या ठिकाणी कुठलाही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी हजर नसल्यामुळे त्या गर्भवती महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या वर्हांड्यांतच झाली.  परिणामी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नवजात बाळ मृत झाले.

या घटनेची चौकशी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ .प्रल्हाद चव्हाण व   अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ तरंग तुषार वारे  यांनी केल्यानंतर या प्रकरणात दोषींना निलंबीत केले. आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णुकांत शिवणकर , बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती अनकाडे व कंत्राटी आरोग्य सेविका श्रीमती स्वाती ढोकपांडे या तिघांची सेवा समाप्ती करण्यात आली तर आरोग्य सहाय्यक प्रेमसिंग चव्हाण ,आरोग्य सहाय्यक पी डी मस्के , आरोग्य सहाय्यक अलका डंभारे तर औषध निर्माण अधिकारी मारोती  भोकरे यांचे निलंबन करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ यांनी दिले आहे तसेच तालुका आरोग्य अधिकारी धम्मपाल मुनेश्वर व विडूळ येथील वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत रिठे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली .

प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्यामुळे कामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा 

Back to top button