

अकोला पुढारी वृत्तसेवा : म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलावरून 17 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता एका 35 वर्षीय युवकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुधीर रमेश तायडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जिल्ह्यात यापूर्वी गांधीग्राम येथील पुलावरून उडी घेवून युवकाने आत्महत्या केली होती. या युवकाचा शोध लागला नाही, तोच ही घटना घडल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
अकोला जिल्ह्यात तसेच आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले तुडुंब भरले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान एका युवकाने म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पात्रात पुलावरून उडी मारली. त्याने आपले चार चाकी वाहन एम. एच. 15 ई. एक्स 5432 ही गाडी पुलाच्या बाजूला पार्क केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उडी घेतलेल्या युवकाचे नाव सुधीर रमेश तायडे असून तो शास्त्री नगरातील रहिवासी आहे. नाशिक येथे खाजगी कंपनीत कामाला असून 6 ऑगस्ट रोजी तो अकोल्यात आला होता. मिळालेल्या माहिती नुसार सुधीर तायडे बुधवारी रात्री 9 वाजता घरून निघाला. घरच्या मोबाईलवर मॅसेज करून आपण म्हैसांग येथील नदीत उडी घेत असल्याची माहिती त्याने दिली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस व सुधीर तायडे यांचे नातेवाईक काल रात्री पासूनच घटनास्थळी हजर झाले. सुधीर तायडे याने नेमकी टोकाची भूमिका का घेतली याचा तपास अद्याप लागलेला नाही.
गांधीग्राम येथून 5 ऑगस्टरोजी पुर्णानदीत वाहून गेलेल्या अक्षय गजानन ताथोड (25) रा. विश्वकर्मा नगर मोठी उमरी अकोला या युवकाचा अद्याप शोध लागला नाही. यासाठी 7 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत गांधीग्रामपासून ते तापीनदी हतनूर धरणापर्यंत सर्च ऑपरेशन राबविले. परंतू अक्षय ताथोड चा शोध लागला नाही. शेवटी 17 ऑगस्टला ही ऑपरेशन थांबवले. तो इलेक्ट्रिशियन होता.
नागरिकांनी सजग रहावे
जिल्हयातील नदी, नाले, तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. संशयास्पदस्थितीत नदी, नाले, तलाव परिसरात कुणी आढळून आल्यास तत्काळ संबधितांना थांबवावे. याशिवाय स्थानिक पोलिस व महसूल प्रशासनाला माहिती द्यावी. जेणेकरून होणारी दुर्घटना टाळता येईल.
– प्रा. संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.