पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाहीला बळ मिळाले : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | पुढारी

पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाहीला बळ मिळाले : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंचायत राज प्रणालीमुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना अधिक शक्ती देण्याचे कार्य केंद्र सरकारने केले आहे. गावासाठी असणारा निधी सरळ ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. या माध्यमातून लोकशाही प्रणाली अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. जिल्हा परिषद आयोजित जिल्हा परिषदेच्या ‘मागील ६० वर्षाचा मागोवा’या पुस्तिकेचे प्रकाशन आणि विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल यांचे प्रधान सचिव संतोष कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आज तंत्रज्ञानाचे युग आहे. पंचवीस वर्षापूर्वी देशाने पाहिलेले डिजीटल युगाचे स्वप्न आज साकार होत आहे. सामान्य नागरिकाला गावाच्या विकासात योगदान देता यावे आणि त्या माध्यमातून कामासाठी होणारा विलंब आणि भ्रष्टाचार बंद व्हावा असा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकशाही प्रणाली अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. यादृष्टीनेच पुणे जिल्हा परिषदेची थेट बँकेत रक्कम जमा करण्याची योजना स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या सहभागाने जिल्हा परिषदेच्या योजना यशस्वी होऊ शकतील असेही कोश्यारी म्हणाले.

देशविकासासाठी प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेची गरज

पुणे ही लोकमान्य टिळकांची कर्मभूमी आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी येथे समाजसुधारणेचे मोठे कार्य केले. पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे. देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे आणि समर्पणाच्या भावनेने कार्य करावे लागेल. आपण कर्तव्य पालनाचे सूत्र स्वीकारले तर आपला जिल्हा, राज्य आणि देश प्रगतीपथावर पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात आयुष प्रसाद म्हणाले, १ मे १९६२ ला जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्याचा अर्थ जनतेचे अधिकार जनतेपर्यंत पोहोचविण्याच्यादृष्टीने पंचायत राज व्यवस्था खूप महत्वाची ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १७ हजारापेक्षा अधिक प्रतिनिधी ग्रामीण भागात जनतेची सेवा करीत आहेत. थेट लोकशाहीचे प्रतिबिंब ग्रामसभेत दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

डाक विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या विशेष कव्हरचे प्रकाशन राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आले. पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी या कव्हर विषयी माहिती दिली. ‘माय स्टॅम्प’योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग घरकूल योजना व यशवंत घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदान वितरीत करण्यात आले. हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

राज्यपालांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचे अनावरण तसेच खेड पंचायत समितीतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘नमन हुतात्मा राजगुरू’या गीताचा शुभारंभही श्री.कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या मागील ६० वर्षाच्या कार्याचा मागोवा या पुस्तिकेबाबत संपादनाचे कार्य केलेली संपादकीय समिती, नमन हुतात्मा राजगुरू ध्वनीफित लाँचिंगसाठी योगदान देणारी टीम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेतील पुरस्कार तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचारी पुरस्काराचेही वितरण राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी, सरंपच, विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button