अमरावती : पोलीस अधीक्षकांचा फाेटाे व्हॉट्स ॲप डीपीवर ठेवून युवतीची फसवणूक | पुढारी

अमरावती : पोलीस अधीक्षकांचा फाेटाे व्हॉट्स ॲप डीपीवर ठेवून युवतीची फसवणूक

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावतीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांचा फाेटाे व्हॉट्स ॲपवर डीपी ठेवून गिफ्ट कार्डच्या माध्यमातून एका युवतीची ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, एका युवतीच्या वडिलांच्या मोबाईलवर रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान मोबाईल क्र. ९६९०९११४६२ वरुन ॲमेझॉन इंडियाचे प्रत्येकी १० हजारांचे ३० गिफ्ट कार्डच्या मागणीचा मॅसेज आला होता. या मोबाईल क्रमांकवर अमरावती ग्रामीण विभागाला ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिलेले पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांचे फोटोचे डीपी व्हॉट्स ॲपवर ठेवण्यात आले होते.  युवतीचा वडिलांची प्रकृती बरोबर नसल्याने तसेच हा मेसेज पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांनीच पाठवल्याचा गैरसमज करीत युवतीने आपल्या मोबाईल वरून १० हजारांचे ३ गिफ्ट कार्ड पाठविले.

युवतीने या प्रकाराबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली.  युवतीच्या वडिलांनी थेट पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन. यांच्याशी संपर्क साधून या गिफ्ट व्हाउचरविषयी शहानिशा केली. मात्र, सा कोणताही मेसेज पाठवले नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. युवतीने चांदूर बाजार पोलीस स्टेशन गाठून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.

चांदूर बाजार पोलिसांनी सदर मोबाईल नंबर वरून चौकशी करीत आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी असेच प्रकरण अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या नावे मनपा कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याबाबत उघड झाले होते.  फसवणूक स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याने पोलीस प्रशासन या प्रकरणाची गुप्तता ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button