‘इन्स्टंट लोन’ फसवणुकीचे ‘चायना कनेक्शन’; कॉलगर्ल म्हणून बदनामीची धमकी देत तरुणीकडून उकळले पैसे | पुढारी

'इन्स्टंट लोन' फसवणुकीचे 'चायना कनेक्शन'; कॉलगर्ल म्हणून बदनामीची धमकी देत तरुणीकडून उकळले पैसे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मोबाईल ॲपच्या माध्यमातून ‘इन्स्टंट लोन’ देण्याच्या बहाण्याने तरुणांना टार्गेट करण्यात येत आहे. यात देशभरातील अनेक घटना उघडकीस आल्या असून यापैकी बदनामीच्या बहाण्याने काहींनी आत्महत्याही केली आहे. मात्र, या ‘इन्स्टंट लोन’  ॲपचे कनेक्शन थेट चीनसोबत असल्याचा खुलासा नागपूरचे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कैफ इब्राहिम सय्यद (वय २५, रा. सोमवार पेठ, कऱ्हाड), ईरशाद ईस्माईल शेख (वय ३२ रा. दापोडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

तरुणीचे फाेटाे पाठवले नातेवाईकांना

याबाबत अधिक माहिती अशी, अजनी पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणीने जानेवारीत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. यामध्ये एका लिंकच्या माध्यमातून तिने लोनसाठी अर्ज केला. त्यासाठी त्यांना पॅन क्रमांक आणि फोटो आयडी दिला. काही वेळातच तिच्या खात्यात १ हजार २०० रुपये जमा झाले. मात्र, काही दिवसात तिला फोनवरुन तिला ५ हजार ४०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. तसेच न केल्यास तिचे अश्लील फोटो टाकून आणि कॉलगर्ल असल्याची माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे युवतीने पैसे टाकले. यानंतर पुन्हा ७ हजार ८०० रुपये एका क्रमांकावरुन मागण्यात आले. तेही दिल्यानंतर या युवतीचे फोटो आणि कॉलगर्ल म्हणून क्रमांक नातेवाईक आणि इतरांना पाठविण्यात आले. त्यातून नातेवाईकांनी अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

मोठे खुलासे होण्याची शक्यता

या प्रकरणाचा तपास करीत असताना, अनेक तांत्रिक बाबी तपासून आणि बँकेचा मदत घेतली असता, त्यात कऱ्हाड येतील दोन युवकांकडून हे काम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यांना पथकाने ताब्यात घेत चौकशी केली असता, त्यातून अनेक खुलासे झाले. विशेष म्हणजे दोन युवकांच्या खात्यात प्रत्येकी २७ लाख रुपये आढळले. त्यांना याबाबत विचारणा केली असता, वसूल रकमेच्या ३ टक्के कमिशनवर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या दोघांकडे हाँगकाँग, चायना, दुबई, फिलिपिन्स येथील मोबाईल नंबर असल्याची बाब समोर आली. त्यामुळे या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता असल्याची माहिती उपायुक्त नुरुल हसन यांनी दिली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे आणि सहायक पोलीस निरीक्षक शेळके यावेळी उपस्थित होते. अशा तक्रारी असल्यास अजनी पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button