भंडारा : रानडुकराची दुचाकीला धडक; तरुण ठार | पुढारी

भंडारा : रानडुकराची दुचाकीला धडक; तरुण ठार

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : रानडुकराने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी-पाथरी शिवारात घडली. प्रदीप गोपीचंद नागपुरे (वय २२ रा. मोहाडी खापा, ता. तुमसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मोठा भाऊ दिलीप गोपीचंद नागपुरे (वय ३५) हा गंभीर जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, खापा मोहाडी येथून दोघे भाऊ दुचाकीवरून (क्रमांक एमपी ५० बीए ७२२७) आष्टी येथे आपल्या बहिणीला भेटण्यास गेले होते. यावेळी आष्टीवरून नाकडोंगरी- पाथरी-कवलेवाडा मार्गे जात असताना पॉवर हाऊसजवळ जंगलातून रस्त्यावर रानडुकर आले. त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली.  दोघे भाऊ खाली पडले. रस्त्याच्या काठावर असलेल्या दगडावर प्रदीपचे डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तमोठा भाऊ गंभीर जखमी झाला.

गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील, उपनिरीक्षक करंगामी, जायभाये यांनी जखमीला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या अपघाताची गोबरवाही पोलिसांत नोंद झाली आहे. दरम्यान, प्रदीप नागपुरेच्या कुटुंबाला वन विभागामार्फत आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button