Ajit Pawar : राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात व्यस्त : अजित पवार | पुढारी

Ajit Pawar : राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात व्यस्त : अजित पवार

डोंगरकडा, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र दिल्ली दौरे करत आहेत. त्यांनी दिल्ली व इतर दौरे थांबवून शेतकर्‍यांना मदत जाहीर करून अडचणीतून बाहेर काढले पाहिजे, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.३०) दुपारी डोंगरकडा येथे केले.

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची त्यांनी (Ajit Pawar) पाहणी केली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजु पाटील नवघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, ज्येष्ठ नेते दत्तराव अडकिणे, आनंदराव कदम, डी. एन. अडकिणे, ठाकूरसिंग बावरी, डॉ. संतोष बोंढारे, शिवाजी शिंदे पुयनेकर, शेख शोएब, योगेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौर्‍यातच व्यस्त आहे. राज्यात शेतकर्‍यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढवले असून, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता त्यांचे दिल्ली दौरेच सुरू आहेत. राज्यातील शेतकर्‍यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. सरकारने प्रत्येक जिल्हयासाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करून नुकसानीची माहिती घ्यावी. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन मोठा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोठे आहेत, हे कळायला मार्ग नाही. सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकर्‍यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button