बुलडाणा : नेटक-यांनी केलं हैराण!; खासदार प्रतापराव जाधवांनी हटविला कॉमेन्टस बॉक्स! | पुढारी

बुलडाणा : नेटक-यांनी केलं हैराण!; खासदार प्रतापराव जाधवांनी हटविला कॉमेन्टस बॉक्स!

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : चार दिवसांपूर्वी शिंदे गटाला जावून मिळालेल्या शिवसेनेच्या बारा खासदारांतील एक बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या अधिकृत फेसबुक प्रोफाईलवरील कॉमेन्टस बॉक्स शनिवारी दुपारपासून हटविला आहे. कॉमेन्टस बॉक्स कायम ठेवणे वा हटवणे ही व्यक्तीस्वातंत्र्याची आणि ऐच्छिक बाब असली तरी खासदार प्रतापराव जाधवांनी ज्या परिस्थितीत हा कॉमेन्टस बॉक्स हटवला त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागली आहे.

त्यांनी अलिकडेच उद्धव ठाकरेंना पाठ दाखवून शिंदे गटाचा पदर धरला आहे. ही बाब जिल्ह्यातील निष्ठावान असंख्य शिवसैनिकांना रूचलेली नाही. तत्पूर्वी मागील आठवड्यात दिल्लीला जाण्यापूर्वी त्यांनी मेहकर शहरातील एका हॉटेलवर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-यांची बैठक घेऊन सर्वांची मते जाणून घेतली होती. त्यावेळी उपस्थितीत ८० टक्के शिवसेना पदाधिका-यांनी आपण ठाकरे गटातच राहू या! असा कौल दिला होता. तथापि खासदार जाधवांनी दिल्लीला जाऊन शिंदे गटाला समर्थन दिले.

त्या घडामोडीनंतर शुक्रवारी ते मेहकरला स्वगृही परतले. आज शनिवारी (दि. २३) रोजी दुपारी जाधव हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतानाचे भाषण त्यांच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह दाखवले जात होते. त्याचवेळी अलिकडील त्यांच्या बदलत्या राजकीय भुमिकेवरून फेसबुकच्या कॉमेन्टस बॉक्सवर नेटक-यांनी उलटसुलट बिनधास्त व विचित्र प्रश्नाचा भडीमार केला.

या प्रकाराने हैराण झाल्यामुळे त्यांनी अखेर कॉमेन्टस बॉक्सच हटविला आहे. आणि सद्याच्या परिस्थितीत नेटक-यांना टाळण्यासाठी हा उपाय शोधला आहे; पण या प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तूळात मात्र चांगलीच रंगत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button