१५ वर्षांच्‍या वेंदातने ३३ लाख रुपये पगाराची नोकरी 'जिंकली'; पण... | पुढारी

१५ वर्षांच्‍या वेंदातने ३३ लाख रुपये पगाराची नोकरी 'जिंकली'; पण...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नागपूर येथील फक्त १५ वर्षं वय असलेल्या वेदांत देवकाते याने अमेरिकेतील एका कंपनीची वेबसाईट बनवण्याची स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्याला या कंपनीने वर्षाला ३३ लाख रुपये पगाराची नोकरीही दिली; पण वेदांतचे वय कमी असल्याने कंपनीने त्याच्या नोकरीचा प्रस्ताव मागे घेतला आहे. या कंपनीने वेदांतचे अभिनंदन केले असून पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

त्‍याच असं झालं की, The New Jersey Advertising Agency या कंपनीने वेबसाईट बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. वेदांतला त्याच्या आईच्या इन्स्टाग्रमावर या स्पर्धेची जाहिरात मिळाली. वेदांतने दोन दिवसांत सुमारे २०६६ ओळींचा कोड लिहून हे काम पूर्ण केले. जवळपास १००० स्पर्धकांतून वेदांतने ही स्पर्धा जिंकली.

या कंपनीने वर्षाला ३३ लाख रुपये पगाराची नोकरीही त्‍याला दिली. वेदांतचे वय कमी असल्याने कंपनीने त्याला दिलेली नोकरीची ऑफर मागे घेतली आहे. वेदांतची आई अश्विनी आणि वडील राजेश दोन्ही नागपूरमधील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. वेदांतला टेक्नॉलॉजीची आवड आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने आईच्या लॅपटॉपचा वापर करून युट्यूबवरील व्हिडिओ पाहात विविध कोडिंगचे कोर्स पूर्ण केले आहेत.

वेदांतला जेव्हा या नोकरीची ऑफर आली तेव्हा त्याने शाळेतील शिक्षकांना ही माहिती दिली. शिक्षकांसाठीही हा आश्चर्याचा धक्काच होता. वेदांतने शिक्षकांच्या मदतीने या कंपनीला इमेल केला. “माझे वय १५ असून मी दहावीत शिकत आहे,” अशी माहिती त्याने या कंपनीला कळवली. वेदांतचे वडील त्याला आता लॅपटॉप घेऊन देणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button