अमरावती : मेळघाटातील भूतनाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू | पुढारी

अमरावती : मेळघाटातील भूतनाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृत्यू

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: मेळघाटात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळत असून रस्ते खराब होत आहे. त्यातून गावांचा संपर्क तुटण्याच्या घटना घडत आहेत. अतिवृष्टीमुळे रायपूर ते सेमाडोह दरम्यान असलेल्या भूतनाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. रायपूर येथील बन्सी सुकलाल बेठेकर (वय ४०) असे मृत आदिवासी युवकाचे नाव आहे.

अतिवृष्टीमुळे मेळघाटातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अती पावसामुळे सध्या मेळघाटातील नदी नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. अशातच मंगळवारी दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान रायपूर येथील बन्सी सुकलाल बेठकर हा युवक रायपूर वरून सेमाडोह येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेला होता. सेमाडोह ढाण्यामध्ये आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तो सेमाडोहकडे येत असताना भूतनालावरून पुलावरून जात असताना अचानक पाणी आले. यात बन्सी बेठेकर यांचा तोल गेला आणि तो पुरात वाहून गेला.

मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. गावकरी व पोलिसांना तो मिळाला नाही. मंगळवारी एनडीआरएफचे पथक बोलवण्यात आले. बुधवारी सकाळी पथक, गावकरी व चिखलदरा पोलिसांच्या मदतीने सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान बन्सी बेठेकर यांचा मृतदेह चिखलदरा पोलिसांना सापडला. सेमाडोह येथील ग्रामस्थांनी चिखलदरा पोलिसांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याची माहिती आहे. सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button