पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू : देवेंद्र फडणवीस | पुढारी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू : देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली आली, तर घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे क्षतिग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज (दि.१९) वर्धा जिह्यातील हिंगणघाट येथून दौरा आटोपून ते गिरड मार्गे चिमूर तालुक्यातील पूरस्थितीची पहाणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या सोबत माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, आमदार बंटी भांगडीया, अतुल देशकर, संजय गजपुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जि. प. अध्यक्षा संध्या गुरनुले, जुनेद खान उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात संततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पिके पाण्याखाली येवून घरांची पडझड झाली. शेतकरी या संकटामुळे क्षतिग्रस्त झाला आहे. शेतकरी आणि सामान्य माणसांचे नुकसान झाले आहे. शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे. त्याची तातडीने पाहणी करून सर्व्हे करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे 55 हजार हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सर्व्हे करून शेतकरी आणि क्षतिग्रस्त नागरिकांना जास्तीज जास्त आर्थिक मदत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुरात सापडलेल्या नागरिकांना आणि ज्या गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. पूर ओसरल्यानंतर अनेक कुटुंबे आपल्या घरी परत देखील गेली आहेत. मात्र जे आश्रयीत आहेत. त्यांची व्यवस्थीत सोय करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

चिमूरात खाती कामठा परिसरात पूरस्थितीची पाहणी

चिमूरातील चार वार्ड पाण्याखाली आल्याने फडणवीस यांनी खातेकामठा परिसरात पाहणी केली. शेती व घरांचे जे नुकसान झाले, अशा आपदग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी मंगला निखार्ते या महिलने नुकसानीची माहिती यावेळी दिली. यावेळी क्षतिग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नवेगाव पेठ मार्गावर पुलाची निर्मिती करणार

नागपूर ते चिमूर मार्गावरील नवेगाव पेठ येथे उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी भाजप पदाधिकारी राजू देवतळे यांनी नवेगाव पेठ ते पिंपळनेरी परिसर हा डाऊन भाग असल्याने उमा नदीचे पाणी या परिसरात मोठ्या प्रमाणात साचते. परिणामत: नवेगाव व पिंपळनेरी गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या परिसरात पुल व्हावा, अशी मागणी राजू देवतळे यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिसरात पुल तयार करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button