गडचिरोली : पुरामुळे जिल्ह्यातील २९ मार्ग बंद; गोसेखुर्द धरणातून ३ लाख ५७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग | पुढारी

गडचिरोली : पुरामुळे जिल्ह्यातील २९ मार्ग बंद; गोसेखुर्द धरणातून ३ लाख ५७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

गडचिरोली,पुढारी वृत्‍तसेवा : गेल्‍या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग केला जात असून जिल्ह्यातील तब्बल २९ मार्ग बंद झाले आहेत. काल (दि. १७) रात्रभर गडचिरोलीसह अन्य तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज सकाळीदेखील पाऊस बरसला. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून ३ लाख ५७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला असून, आज दुपारपासून गडचिरोली-नागपूर मार्गावरील दळणवळण बंद झाले आहे. तेलगंणा राज्यातील मेडिगड्डा प्रकल्पाच्या ८५ दरवाज्यांमधून ७ लाख १६ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यातील पूरस्थिती कायम आहे.

डायलिसीसच्या रुग्णाला पूरग्रस्त क्षेत्रातून दवाखान्यात हलविले

गडचिरोली तालुक्यातील कुंभी-मोकासा येथील आनंदराव मेश्राम हा इसम डायलिसीसने आजारी आहे. परंतु गाव चहूबाजूंनी पुराने वेढलेले असल्याने पोलिस विभागाच्या एमटीएस बचाव पथकाने त्यास बोटीने गावाबाहेर आणले. नंतर त्याला गडचिरोली येथील जिल्हा  रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भामरागड गावात ५० घरे पाण्याखाली

पर्लकोटा नदीला दुसऱ्यांदा पूर आला असून पुराचे पाणी भामरागड गावात शिरले आहे. तेथील बाजारपेठेतील दुकाने आणि वस्तीतील जवळपास ५० घरे अद्यापही पाण्याखाली आहेत. पूरबाधित २२ गावांतील ३०५ कुटुंबांतील २ हजार ३३७ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सध्या गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी, आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-भामरागड हे प्रमुख मार्ग बंद आहेत.

Back to top button