भंडारा : पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला | पुढारी

भंडारा : पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर नाल्यातील पाण्यात वाहून गेलेल्या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज (दि.16) सकाळी 8 वाजता सापडला. घटनास्थळापासून ५० ते ६० फुटावर झुडपात अडकलेला मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

गुरूवारी (दि. १४) रात्री ८ च्या सुमारास रवी टेकाम व सारांश सुखदेवे हे दोघेही मोटारसायकलने खैरलांजी (मध्य प्रदेश) येथे घरी जात होते. यावेऴी तुमसर तालुक्यातील चिखला – कवलेवाडा रस्त्यावरील नाल्याला आलेल्या पुरात मोटारसायकलसह दोघेही वाहून गेले होते. मात्र, सुदैवाने रवी टेकाम हा पाण्याबाहेर निघाला. मात्र, सारांश सुखदेवे हा मोटारसायकलसह पुरात वाहून गेला होता.

घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यांनी शोध कार्य सुरू केले. मात्र, अंधार पडल्याने त्या दिवशी शोध कार्य थांबविण्यात आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी पुरात वाहून गेलेली मोटार सायकल (क्रं. एम एच ३६ /३०२०) सापडली. मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे तो दूरवर वाहून गेल्याचा संशय होता.

गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील, तहसीलदार बाळासाहेब टेळे यांनी गोताखोरांच्या मदतीने नाल्यात वाढलेल्या झाडीझुडपात शोध घेण्यास सांगितले. अखेर शनिवारी सकाळी झाडांच्या फांद्यात त्याचा मृतदेह अडकल्याचे दिसून आले. गोबरवाही पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.  तपास गोबरवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, उपनिरीक्षक विलास करंगामी, बीट अंमलदार चव्हाण करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button