

घाटंजी; पुढारी वृत्तसेवा : मानोली (ता. घाटंजी) ग्रामपंचायतीच्या मार्च २०१५ ला झालेल्या पोटनिवडणुकीत मतदान पेट्या खासगी वाहनाने मतमोजणी केंद्रापर्यंत नेल्याप्रकरणी निवडणूक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील चारही जणांची आज घाटंजी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. शैलेश मडावी (वाघापूर, यवतमाळ), दिलीप मानगांवकर (पार्डी-जांब), कोंडबा मडावी (अंबानगरी, घाटंजी) व अमित वानखडे (नुक्ती) अशी त्यांची नावे आहेत.
मानोली ग्रामपंचायतची सार्वत्रिक पोटनिवडणूक २५ मार्च २०१५ रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी क्षेत्रिय अधिकारी म्हणून व्ही. एल. कुंटावार, केंद्राध्यक्ष शैलेश मडावी व दोन कर्मचारी असे चौघे मतदान केंद्रावर कार्यरत होते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान पेट्या सिल करुन शासकीय वाहनाने नेणे बंधनकारक असतानाही या कर्मचाऱ्यांनी मोटरसायकलने घाटंजी येथे नेल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अन्वये चौघांवर गुन्हा दाखल केला होता. आज दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांनी सर्वांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
हेही वाचलंत का?