गडचिरोली : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केली पूरपरिस्थितीची पाहणी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केली पूरपरिस्थितीची पाहणी

गडचिरोली,पुढारी वृत्‍तसेवा : गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. पूरपरिस्थिती आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आहेत.

नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आल्यानंतर हेलिकॉप्टरने ते गडचिरोलीला जाणार होते. पण खराब हवामानामुळे ते शक्य झाले नाही. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, गडचिरोलीत पूरग्रस्त परिस्थिती असल्याने पाहणी करणार आहोत. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून प्रशासकीय यंत्रणा अलर्ट आहे. कुठेही मालमत्ता आणि जीवित हानी होणार नाही, यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या असून राज्यातील इतर भागांतही विशेष सूचना दिल्या आहेत. पूरपरिस्थितीबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन , मिल्ट्री, एनडीआरएस सर्वांशी चर्चा झाली आहे, त्यांना अलर्ट केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर काही काळ थांबून त्यांनी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणीपातळी आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर ,पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी विमानतळावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला.

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज प्रथमच गडचिरोलीत आले. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आहेत. गडचिरोली जिल्ह्यात गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे दक्षिण गडचिरोलीला मोठा फटका बसला आहे. या भागातील नदी नाले तुडुंब वाहत असल्याने काही मार्गही बंद झाले आहेत. याशिवाय मेडीगट्टा आणि गोसीखुर्द या धरणांच्या पाणी विसर्गामुळे जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याची अवस्था आहे. या सर्वांचा आढावा घेण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या नियोजन भवनात उच्चस्तरीय आढावा बैठकीत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. ते काही ठिकाणी स्वतः पूरपरिस्थिती बघण्यासाठी जाण्याचीही शक्यता आहे. प्रशासनाने नियोजन भवन परिसरात रंगीत तालीम घेत मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते दिशानिर्देश देतात, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news