शिवसेनेमधील आमदारांचा उद्धव ठाकरेंकडून अवमान | पुढारी

शिवसेनेमधील आमदारांचा उद्धव ठाकरेंकडून अवमान

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वपक्षातील आमदारांची कामे करण्यात रस नव्हता, असा आरोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांनी मंगळवारी केला. ठाकरे यांच्याकडून सेना आमदारांना
नेहमीच अवमानास्पद वागणूक मिळाल्याचे ते म्हणाले. तब्बल 18 दिवसांनंतर ते येथे परतल्यानंतर पत्रपरिषदेत बोलत होते. आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी व शिवसेना वाचवण्यासाठीच विशिष्ट भूमिका घेतली. आता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नवे सरकार आले आहे. आमचीच मूळ शिवसेना असून शिवसेना वाचवण्यासाठीच काळाची गरज म्हणून हा उठाव केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊनच पुढे जाणार असून त्यांचे नाव व फोटो आम्ही वापरणारच आहोत. बाळासाहेब केवळ एका परिवाराचे नव्हते तर ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणा- या शिवसैनिकांचे श्रद्धास्थान होते, असे ते म्हणाले. शासकीय बैठकांखेरीज आम्हा आमदारांना मातोश्री किंवा वर्षावर कधीच भेट मिळाली नाही. मतदारसंघातील कामांची मी मुख्यमंत्र्यांना दोनशे पत्रे पाठवली होती.त्यातील एकाही पत्राचे उत्तर आले नाही, असे त्यांनी सांगितले. या पत्र परिषदेला भाजप नेते योगेंद्र
गोडे उपस्थित होते

सुरक्षा रक्षकांनी बाजुला ढकलले

माझ्या मुलाची लग्नपत्रिका घेऊन निमंत्रण देण्यासाठी मी मुख्यमंत्री ठाकरेंकडे गेलो होतो. त्यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांनी मला 50 फूट बाजूला ढकलले. त्यांचेसमक्ष असा अपमानास्पद प्रकार झाला होता, पण ठाकरे यांनी त्यात लक्ष घातले नव्हते. गुलाबराव पाटील, दादा भुसे यांनाही जिव्हारी लागणारे शब्द उद्धव ठाकरेंनी सुनावले, असा आरोप त्यांनी केला.

Back to top button