नागपूर : वीज पडल्याने तीन शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्युमुखी | पुढारी

नागपूर : वीज पडल्याने तीन शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्युमुखी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात मान्सूनच्या पावसाला जोरात सुरूवात झाली नसली तरी, शनिवारी झालेला सोसाट्याचा वारा आणि विज पडल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील तीन शेतकर्‍यांसह एक बैलजोडी मृत्यूमुखी पडले आहेत. यात दहा दिवसांपुर्वी लग्न झालेल्या एका शेतकर्‍याचा, तर दुसऱ्या एका घटनेत पाच महिन्यापुर्वी लग्न झालेल्या शेतकर्‍याचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.

जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वीज पडून तीन वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांसह बैलजोडी ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. योगेश रमेश पाठे (वय २७, हिवरमठ), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (३४) व बाबाराव मुकाजी इंगळे (६०, दोघेही रा. मुक्तापूर) अशी मृतांची नावे आहेत. वीज कोसळलेल्या व्यक्तींची गावे ही जवळजवळच आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरमठ येथील योगेश रमेश पाठे हा घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतात पेरणी करीत होता. दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने योगेश घरी जाण्यासाठी रस्त्यावरील दुचाकीजवळ पोहोचला. अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेशचे दहा दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याला वडील नसून, तो मोठा भाऊ व आईसोबत राहायचा.

मुक्तापूर शिवारात पावसामुळे शेतातील झोपडीत दिनेश ज्ञानेश्वर कामडी व बाबाराव मुकाजी इंगळे हे दोघेजण बसले होते. विजांचा कडकडाट सुरू असताना अचानक वीज झोपडीवर कोसळली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतक दिनेशचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अधिक वेळ होऊनही शेतातून का परतले नाही म्हणून दिनेशचे वडील शेतात पाहायला गेले असता दोघेही शेतातील झोपडीत मृतावस्थेत पडून होते.

तसेच पिंपळगाव (राऊत) शिवारात भिष्णूर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून यामध्ये बैलजोडी दगावली. या घटनेची माहिती मिळताच नरखेड पंचायत समिती सभापती नीलिमा सतीश रेवतकर यांनी भेट दिली. त्यानंतर तलाठी तारकेश्वर घाटोले, वसंत नासरे, राऊत यांनी तिन्ही घटनांची माहिती पोलीस व तहसीलदार जाधव यांना दिली. ठाणेदार मनोज चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Back to top button