राज्यसभेच्या निवडणुकीला भाजपचा हट्टीपणा जबाबदार : सु्प्रिया सुळे | पुढारी

राज्यसभेच्या निवडणुकीला भाजपचा हट्टीपणा जबाबदार : सु्प्रिया सुळे

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीला भाजपचा हट्टीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप नेत्यांशी यांसदर्भात चर्चा केली. निवडणुकीत काही चुकीचे प्रकार होऊ शकतात, अशी कल्पना त्यांना दिली. उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. तरीदेखील भाजपने आपला उमेदवार उभा केला असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मंगळवारी (दि. ७) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकार परिषदेत बोलताना खा. सु्प्रिया सुळे म्हणाल्या,  समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. महामागाईने माणूस त्रस्त झाला आहे. त्यावर बोलण्याची गरज आहे. सध्या राज्यात धार्मिक अराजकता पसरली आहे. हनुमान जन्मभूमीवरून झालेल्या बैठकीत प्रचंड मतभेद आणि भांडण आहे. परंतु याविषयी भांडणे हे आपले संस्कार नाहीत. हा सारा प्रकार  आपल्या देशात नेमका कुठून येत आहे, याची आम्हाला चिंता वाटत आहे.

आमच्या पक्षातील अनेक नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले. जेव्हा पहिल्यांदा अनिल देशमुखांवर आरोप झाले, तेव्हा पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर नबाव मलिकांनाही त्याच पद्धतीने अडकविण्यात आले. परंतु, पक्षाने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही. हे सर्व केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारचे षडयंत्र असल्याचा दावा खासदार सुळेंनी व्यक्त केला आहे.

मी खासदार म्हणूनच समाधानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील सुरू असलेल्या त्यांच्या नावाच्या चर्चेला त्यांनी या पत्रकार परिषदे दरम्यान पूर्णविराम दिला. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष राजीव कक्कड़, महिला अध्यक्ष बेबीताई उईके आदींची उपस्थिती होती.

अपक्ष आमदारांच्या घरी भेट

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी सु्प्रीया सुळे यांनी भेट दिली. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांच्या मतांचे वजन वाढले आहे. यापार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अनेक दिवसांपासून जोरगेवार यांच्या गृहभेटीचे आमंत्रण होते ते यावेळच्या चंद्रपूर जिल्हयाच्या दौऱ्यादरम्यान आज पूर्ण केले.

Back to top button