

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : स्व:ताच्या शेतातील कटाई केलेल्या सागवनाच्या लाकडांची वाहतूक करण्याकरिता लागणाऱ्या निर्गत परवान्याकरीता १ लाखांची लाच घेताना वनपालाला अटक करण्यात आली. ही कारवाई चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी उपवन क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. वासुदेव लहानु कोडापे (वय ४०) असे आरोपीचे नाव असून ते पाथरी उपवनक्षेत्राचे वनपाल आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील शेतकरी तथा तक्रारदार याची सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत पाथरी उपवन क्षेत्रात शेती आहे. सदर शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील सागवनाची झाडे कटाई केली होती. या लाकडाची ठेकेदाराला वाहतूक करण्याकरीता निर्गत परवाना (टिपी)ची मागणी पाथरी वनपरिक्षेत्राचे वनपालांकडे केली होती.
दरम्यान, निर्गत परवाना (टीपी) देण्यासाठी वनपाल वासुदेव कोडापे यांनी तक्रारदाराकडे १ लाख २ हजार रुपयाची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तडजोडीअंती शुक्रवारी शासकीय निवासस्थानी लाचलुचपत विभागाने १ लाख रुपये स्वीकारताना वनपाल कोडापे यांना रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा भरडे, रमेश दुपारे, नरेश नन्नावरे, रवीकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यांनी केली.