कोरोनामुक्ती कडे विदर्भाची वाटचाल : चार दिवसात एकाही मृत्यूची नोंद नाही | पुढारी

कोरोनामुक्ती कडे विदर्भाची वाटचाल : चार दिवसात एकाही मृत्यूची नोंद नाही

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील अकरा जिल्हयातील कोरोना विषयक आरोग्य परिस्थितीत कमालीची सुधारणा होत असून मागील चार दिवसात अकराही जिल्ह्यात नागपुर वगळता एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नागपुरात गुरूवारी कोरोनामुळे एक मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुक्ती च्या दिशेने विदर्भाची वाटचाल सुरू असल्याचे समाधानकारक चित्र सध्या तरी दिसतंय.

विदर्भातील अकरा जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचंच चित्र आहे. त्यामुळे विदर्भवासियांना मोठा दिलासा मिळाला. विदर्भात गेल्या चार दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. तर गुरूवारी (दि १२)संपूर्ण विदर्भात केवळ ३१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

विदर्भाचा रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर

विदर्भाचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. चांगल्या उपाययोजनांमुळे रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर पोहोचला. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा हे जिल्हे येतात. या सर्वच जिल्ह्यांमध्ये आता कोरोना आटोक्यात येताना दिसत आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची कोरोनामुक्ती कडे वाटचाल सुरु आहे. गेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यात पाच रुग्ण सापडले. मात्र ग्रामीण भागात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.

सध्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात ११० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ४५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर २४ तासात एका मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात ५ हजार ६७० चाचण्या झाल्या. त्यापैकी ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट

विदर्भात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट नोंदविली जात आहे. काही जिल्हे कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच गुरूवारी ३१ नवे बाधित आढळून आले. उपचारानंतर ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर अकरा जिल्ह्यांत नागपूर व्यतिरीक्त कुठेही मृत्यूची नोंद झाली नाही. नागपुरात आज एका रूग्णाचा मृत्यू झाला. ही बाब आरोग्य प्रशासनासाठी दिलासादायक मानली जात आहे.

जिल्हानिहाय आढळलेल्या रुग्णांमध्ये नागपूर पाच, अकोला सहा , वर्धा एक, चंद्रपूर दोन, वाशीम एक , बुलडाणा सात , अमरावती चार तर गडचिरोली जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

तर यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज एकही नविन रूग्ण सापडला नाही. आजवर विदर्भात ११लाख १८ हजार ७५९ बाधित आढळले आहेत. यातील १० लाख ९६ हजार ९५३ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. मात्र २१ हजार २२८ रुग्णांचा मृत्यू झाला.

Back to top button