शेतक-यांवरील अन्यायकारक धोरण रद्द करावे ; पंतप्रधान मोदींना दिले निवेदन | पुढारी

शेतक-यांवरील अन्यायकारक धोरण रद्द करावे ; पंतप्रधान मोदींना दिले निवेदन

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे जगणे हलाखीचे झालेले आहे. महागाईने कळस गाठलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमसर-मोहाडी विधान सभेच्या सहकार्याने खापा (तुमसर) येथील चौरस्त्यावर हजारो शेतक-यांसह रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शेतक-यावरील अन्यायकारक धोरण रद्द करावे, वाढती महागाई तसेच बेरोजगारीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. २७)  राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी बांधवानी उपविभागीय अधिकारी  यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले.

‘या’ आहेत निवेदनातील मागण्या

  • केंद्र शासनाकडून राज्य शासनाला संपूर्ण रब्बी (उन्हाळी) धान्य खरेदीची हमी देण्यात यावी. तसेच धान्य खरेदी मर्यादा वाढवून द्यावी.
  • शेतक-यांकडून उन्हाळी धान्याची खरेदी प्रती हेक्टरी ५० क्विंटल करण्यात यावी.
  • धान्याला उत्पादन खर्चानुसार तीन हजार रुपये प्रति क्‍विं. हमी भाव देण्यात यावा.
  • धान्य विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीबाबत मुदत वाढवून द्यावी.
  • शेत मालाला योग्य हमी भाव देण्यात यावा.
  • शेतक-यांना पी. एम. किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांऐवजी २० हजार रुपये रक्‍कम देण्यात यावी.
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी शेतक-यासाठी लागू करण्यात यावी.
  • शेती उपयोगी यंत्रसामुग्री शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध कारण्यात यावीत.
  • जिवनावश्यक वस्तुंच्या किंमती कमी करण्यात यावे.
  • खते, बी-बियाने, लोखंड, सिमेंट, औषधे तसेच पेटोल-डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ कमी करावी.
  • ग्रामीण व शहरी भागातील घरकुल अनुदानात वाढ करण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्‍या आहेत.

Back to top button