चंद्रपूर : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेले दांपत्यावर वाघाच्या हल्ला; पत्नी ठार, पती बेपत्ता | पुढारी

चंद्रपूर : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेले दांपत्यावर वाघाच्या हल्ला; पत्नी ठार, पती बेपत्ता

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : परिस्थिती गरीबीची असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्यावर वाघाने हल्ला केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती बेपत्ता आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात केवाडा गावालगतच्या जंगलात आज (दि. 24) सकाळच्या सुमारास घडली. 45 वर्षीय पत्नी मिना विकास जांभूळकर या महिलेचा मृतदेह आढळून आला असून पती विकास जांभुळकर (55) हे बेपत्ता आहेत. या घटनेने केवाडा व गोंदोंडा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.

चिमूर तालुक्यातील केवाडा निवासी विकास जांभूळकर यांची परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे दरवर्षी ते उन्हाळ्यामध्ये तेंदूपत्ता तोडून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून संसाराला उदरनिर्वाह करतात. यावेळीही सध्या सुरू असलेल्या तेंदूपत्ता तोडण्यासाठी मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास पती विकास जांभुळकर व पत्नी मीना जांभुळकर हे दोघेही काही लोकांसोबत तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या कक्ष क्रमांक 34 मध्ये केवाडा गावापासून एक किलोमीटर अंतराच्या परिसरात गेले होते. जंगलात गेल्यानंतर सोबत असलेले काही लोक तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतरत्र विखुरले गेले.

दरम्यान याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने सर्वप्रथम मीना जांभुळकर यांच्यावर हल्ला केला व त्यानंतर पतीवर हल्ला केला. नेहमीप्रमाणे दोघेही पती-पत्नी साडेदहा वाजेपर्यंत तेंदूपत्ता तोडून घरी यायचे. आज साडे अकरा वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत.मात्र इतर सहकारी घरी परतले. त्यामुळे त्यांच्या दोन मुलांनी गावालगतच्या एक किमी परिसरातील जंगलात काही व्यक्तींसोबत जाऊन पाहणी केली असता कक्ष क्रमांक 34 मध्ये मीना जांभूळकर यांचा मृतदेह आढळून आला. तर मृतदेहापासून पन्नास मीटर परिसरात विकास जाभुळकर यांचा रक्ताने माखलेला चष्मा आढळून आला. त्यामुळे पत्नी पाठोपाठ पतीही वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची शक्यता आहे.

नेरी वनविभागाचे सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी रासेकर यांना माहिती देण्यात आली. ते वनरक्षक नागरे व चमूसह घटनास्थळी रवाना झाले. सर्वप्रथम मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनाकरीता चिमूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर स्थानीक पिआरटी चमू व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी कक्ष क्रमांक 34 मध्ये विकास जांभुळकर यांचा शोध घेतला. मात्र दिवसभरात त्यांचा शोध लागला नाही. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने शोध मोहीम थाबविण्यात आली.

Back to top button