भंडारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू | पुढारी

भंडारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा: बेदरकारपणे दुचाकी चालविताना अपघात झाल्याने दोघांना जीव गमवावा लागला आहे. अपघातात भंडाराजवळील वैनगंगा नदीपुलाजवळ आणि तुमसर-रामटेक मार्गावरील नागठाणा येथे या घटना घडल्या. राधेश्याम उरकुड पटेल ( वय ५४, रा. जरीपटका नागपूर ) आणि मंगेश रमेश वरवाडे ( वय २८, रा. गोवरी, जि. नागपूर ) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत.

जरीपटका येथील राधेश्याम पटेल आणि त्याचा मित्र सुधीर मेंढे याच्यासोबत बालाघाट जिल्ह्यातील कटंगी येथे मित्राच्या लग्नासाठी दुचाकी (क्र. एमएच ३१ डीवाय ५७४२) ने जात होते. त्यांची दुचाकी नागठाणा येथील पुलाजवळ येताच दारुच्या नशेत असलेल्या राधेश्यामचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. या अपघातात राधेश्यामचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र सुधीर मेंढे किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

दुसरी घटना भंडाराजवळ वैनगंगा पुलाजवळ घडली. जनक इतवारी वर्मा (रा. भांडेवाडी, नागपूर) हे मुलगा व मुलीसोबत दुचाकीने जात असताना मंगेश वरवाडे (रा. गोवरी) या युवकाने समोरुन भरधाव दुचाकी चालवित जनक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मंगेश वरवाडे याचा मृत्यू झाला. तर जनक यांचा मुलगा रोशन आणि मुलगी दिपाली गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button