यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : येथील जयभीम चौक पाटीपुरा परिसरातील दवाखान्याजवळ ७ जण दारू पित असताना त्यांना दोघांनी हटकले. त्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी शनिवारी रात्री १०.४५ च्या सुमारास दोन्ही गट एकत्र आले. त्यावेळी नऊ जणांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. वैभव कृष्णराव नाईक (वय २३, रा.बांगरनगर) असे मृताचे नाव आहे. तर नयन नरेश सौदागर (वय २२, रा. विठ्ठलवाडी) व सुहास अनिल खैरकार (वय २६, रा. अशोकनगर, पाटीपुरा ) असे गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हा हल्ला आरोपी शुभम वासनिक (वय २६), बंटी उर्फ रत्नदीप पटाले (वय २२), करण तिहले (वय २३), अर्जुन तिहले (वय २२), रोशन उर्फ डीजे नाईक (वय २५), प्रथम रोकडे (वय २१), अभी कसारे (वय २०) व इतर तीन जण सर्व रा.जयभीम चौक पाटीपुरा यांनी केला.
याबाबत अधिक माहिती अशी, ३० एप्रिल रोजी पाटीपुरा परिसरातील सरकारी दवाखाना येथे नयन सौदागर, वैभव नाईक, सुहास खैरकार यांचा आरोपींशी वाद झाला होता. आरोपी दवाखाना परिसरात दारू पित होते. त्यावरून त्यांना नयन व त्याच्या मित्राने हटकले. त्याचवेळी आरोपींनी नयनला शिवीगाळ करीत मारहाण केली. हा वाद मनोज कनोजिया याने मध्यस्थी करून सोडविला. त्यावेळी जाताना आरोपींनी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर, हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी वैभव नाईक व त्याच्या मित्रांना जयभीम चौकात बोलविण्यात आले.
या ठिकाणी दबा धरून असलेल्या आरोपींनी एकाच वेळी तिघांवर धारदार चाकूने हल्ला केला. वैभव नाईक याच्या काखेत चाकूचा वार झाला. त्यात तो जागीच गतप्राण झाला. तर तेथून नयन सौदागर व सुहास खैरकार यांनी पळ काढला. मात्र, आरोपींनी पाठलाग करून त्यांच्यावरही चाकूने वार केले. आरडाओरडा होताच, घटनास्थळावरून आरोपी पसार झाले. नयनच्या पाठीवर तर सुहासच्या डोक्यात चाकूचे वार झाले. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ जखमींना घटनास्थळावरून उचलून शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे वैभवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर इतर दोघांवर उपचार करण्यात आले. या प्रकरणी आदेश अनिल खैरकार याने दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचलंत का ?