भंडारा : जावयाने ढकलून दिलेल्या भावाचा मृतदेह काढताना लहान भावाचाही बुडून मृत्यू | पुढारी

भंडारा : जावयाने ढकलून दिलेल्या भावाचा मृतदेह काढताना लहान भावाचाही बुडून मृत्यू

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात जावयाने ढकलून दिल्याने भावाचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, भावाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या लहान भावाचाही दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील सिंधी येथे आज (दि.२) घडली.

सिंधी येथील रहिवाशी हरी गोविंदा नागपुरे (वय ६५) व चंद्रभान गोविंदा नागपुरे (वय ५५) अशी कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या दोन भावंडांची नांवे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मोठा भाऊ हरी यास त्याच्या जावयाने कालव्यात ढकलले. त्यामुळे खोल पाण्यात बुडून हरी याचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी लहान भाऊ चंद्रभान हा त्याचा प्रेत कालव्यातून बाहेर काढतो, असे म्हणून सकाळी कालव्यात उडी घेतली. मात्र कालव्यात पाणी अधिक असल्याने त्याचाही कालव्यात बुडून मृत्यू झाला.

पवनी पोलिसांनी दोन्ही मृतदेह कालव्यातून बाहेर काढले. याप्रकरणी आरोपी अनिल नारायण हटवार (वय ४३, रा. वाही) यास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button