राज्यमंत्री बच्चू कडूंनी केली फसवणूक; अकोल्यात गुन्हा दाखल | पुढारी

राज्यमंत्री बच्चू कडूंनी केली फसवणूक; अकोल्यात गुन्हा दाखल

अकोला: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामातील अपहारप्रकरणी राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी भादंवि कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१नुसार काल बुधवारी (दि. २७) रोजी गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करुन कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे सिटी कोतवाली पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने कार्यवाहीचा आदेश दिला. हे गुन्हे अजामीन पात्र स्वरुपाचे आहेत.

जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जिल्हा परिषदेकडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलासाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार १० मार्च २०२१ रोजी झालेल्या जि. प. च्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून प्रस्ताव समितीकडे पाठवण्यात आला होता. मात्र, जि. प. च्या या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल केले. शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळवला. शासनाच्या १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.

याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, कारवाई न झाल्याने वंचिततर्फे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी पालकमंत्री बच्चू कडूविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (३) अंतर्गत प्रकरण न्यायालयात दाखल केले होते.

वंचित बहुजन आघाडीचे धैर्यवर्धन पुंडकरांची तक्रार

पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा भादंविचे कलम ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१अन्वये नोंदवण्यात आला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी संहिका प्रकिया १५६ (३) च्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश फिर्यादींनी स्वत: ठाण्यात सादर केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

नेमकी काय आहे तक्रार

1) गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणा-या पुल व पोच मार्गाचे बांधकाम करणे (किंमत ५० लाख) तसेच बाळापूर तालुक्यातील जुने धनेगाव ते नवे धनेगाव हा रस्ता.

2) इतर जिल्हा मार्ग ११ ला जोडल्या जाणा-या धामणा (ता. जि. अकोला) मुख्य रस्ता ते नवीन धामणा जोड रस्त्याची सुधारणा करणे (किंमत २० लाख)

3) कुटासा ते पिंपळोद रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे. हा ग्रामीण मार्ग असून, त्याला इतर जिल्हा मार्गामध्ये दाखवू निधी वळता केला. (एक कोटी २५ लाख)

हेही वाचलंत का? 

माझ्यावरील आरोप खोटे

एक रुपयाचाही भ्रष्टाचार मी केला नाही. जर माझ्यावरील गुन्हा सिद्ध झाला तर मी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासमोर हात कलम करायला तयार आहे. चुकीच्या बातम्या पसरवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
– बच्चू कडू , राज्यमंत्री तथा पालकमंत्री, अकोला.

Back to top button