नागपूर : वृद्ध आईचा खून करून बेरोजगार इंजिनिअर मुलाची आत्महत्या | पुढारी

नागपूर : वृद्ध आईचा खून करून बेरोजगार इंजिनिअर मुलाची आत्महत्या

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वृद्ध आईची हत्या केल्यानंतर मुलाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदुस्थान कॉलनीत उघडकीस आली आहे. दोन्ही मृतदेह कुजलेले असल्याने ही घटना सुमारे ३ ते ४ दिवसांपूर्वीची असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. लीला विष्णू चोपडे (७८) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर श्रीनिवास विष्णू चोपडे (५१) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलगा इंजिनिअर असून, तो बेरोजगार होता. तो आईसोबत राहायचा. त्याने आईची हत्त्या कोणत्या कारणाने केली या बाबत खुलासा होऊ शकला नाही. लीला चोपडे यांच्या मालकीचा मोठा बंगला हिंदुस्थान कॉलनीत आहे. या बंगल्यात त्या श्रीनिवाससोबत राहत होत्या. श्रीनिवास बेरोजगार असल्याने लीला चोपडे यांना मिळत असलेल्या पेन्शनमधून त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.

गेल्या तीन दिवसांपासून लीला यांची मुंबईला राहणारी मोठी मुलगी भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, फोन कुणीही घेत नसल्याने त्यांनी एका नातेवाईकाला घरी जाण्यास सांगितले. चोपडे यांचे घर आतून बंद असल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर दार तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. तेव्हा लीला आणि त्यांचा मुलगा श्रीनिवास मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तेव्हा वृद्ध लीला यांच्या अंगावर चाकूने भोसकल्याचे घाव दिसून आले. तर मुलाच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली आढळून आली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button