कोल्हापूर : कुणाचं होणार ‘चांगभलं’!

कोल्हापूर : कुणाचं होणार ‘चांगभलं’!
Published on
Updated on

कोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने गेले महिनाभर कोल्हापूरने राजकीय धुळवड अनुभवली. 'कोल्हापूर उत्तर'वर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा, यासाठी राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजपच्या मातब्बर मंडळींनी मुक्काम ठोकला. प्रचाराची अक्षरश: राळ उडवली. विजयाचे दावे-प्रतिदावे केले गेले.

अत्यंत अटीतटीने आणि टोकाच्या ईर्ष्येने निवडणूक लढली गेल्याने समर्थक, कार्यकर्त्यांसह सामान्यांनाही निकालाची उत्कंठा अन् हुरहुर लागली आहे. काटाजोड झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आता काही तास बाकी राहिले आहेत. अंदाज काय? कुणाची हवा? कोण येणार? अशीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. शनिवारी दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा आहे. लाखो भाविक जिल्ह्यात चांगभलंचा गजर करत दाखल झाले आहेत. त्यातच शनिवारी महाविकास आघाडीच्या श्रीमती जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यापैकी 'कुणाच्या कपाळी विजयाचा गुलाल' लागणार आणि कुणाचं 'चांगभलं' होणार! याकडेही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. पहिल्यांदा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले; परंतु पोटनिवडणूक लागली. भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. तत्पूर्वीच, कदम यांनी प्रचारही सुरू केला होता. काँग्रेसकडून आ. जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित होती. परंतु, बालेकिल्ला असल्याने शिवसेनेनेही दंड थोपटले होते.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे महाविकास आघाडींतर्गतच मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्न सुरू होते. परिणामी, महाविकास आघाडीचे त्रांगडे निर्माण झाले होते. जाधव या काँग्रेसकडून रिंगणात उतरणार की महाविकास आघाडीकडून लढणार, हे स्पष्ट नव्हते. अखेर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांना थांबण्याचे आदेश दिले. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाधव यांना शिवसेनेने पाठिंबा दिला.

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात अत्यंत टोकाचे राजकारण सुरू आहे. त्याचीच प्रचिती कोल्हापुरातही आली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातच 'काँटे की टक्कर' झाली. पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली.

दोन्ही उमेदवार बाजूला राहिले आणि या दोन नेत्यांतच एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेतेमंडळींनीही एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढविले. राजकीय वातावरण चांगलेच पेटले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक नेतेमंडळींनी प्रचारसभांत आरोपांच्या तोफा डागून कोल्हापूरचे राजकीय वातावरण ढवळून काढले. थेट 'ईडी'च्या चौकशीपर्यंत निवडणूक गेली. समर्थक व कार्यकर्त्यांनी

गल्लीबोळ पिंजून काढत प्रचारात आक्रमकता आणली. दिवसागणीक पारडे फिरून वातावरण बदलत होते. दोन्ही बाजूंचे समर्थक आपलाच उमेदवार विजयी होणार आणि आपणच विजयाचा गुलाल उधळणार, असा दावा करत आहेत. कोल्हापूरचे राजकीय रणांगण चांगलेच तापल्याने राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

शिवसेनेची मते कुणाच्या पारड्यात?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. सातपैकी पाच निवडणुकांत शिवसेनेने विजय मिळवून भगवा फडकावला आहे. यंदाच्या पोटनिवडणुकीत भगवा कळीचा मुद्दा ठरला. शिवसेनेची मते निर्णायक ठरणार असल्याने भाजपने भगव्यावरून वातावरण चांगलेच तापवले. महाविकास आघाडीनेही प्रत्येक सभेत आणि पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ठळक छायाचित्र घेतले. त्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला. काही ठिकाणी वादावादीच्याही घटना घडल्या. आता निकालानंतर शिवसेनेची मते कुणाच्या पारड्यात पडली, हे स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news