भंडारा : वीज भारनियमनाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या | पुढारी

भंडारा : वीज भारनियमनाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : कृष्णा शालिकराम अतकरी (वय २३, रा. सोमलवाडा) याने झाडाला गळफास लावून घेवून आज सकाळी आत्‍महत्‍या केली. भंडारा जिल्‍हातील लाखनी तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून भारनियमन सुरू आहे. या कृषी पंपाच्या भारनियमनाला कंटाळून कृष्‍णा याने जीवनयात्रा संपवले अशी माहिती त्‍याच्‍या नातेवाईकांनी दिली.

गेल्‍या काही दिवसापासून शेतीला फक्त दीड तास वीजपुरवठा सुरू आहे. हाती आलेले पीक निघून जाण्याची भीती होती. शेतीवरच कुटुंबाचा आर्थिक भार असल्यामुळे हातात पिकच लागत नाही. त्यामुळे घरखर्च भागविणे कठीण होत असल्याने कृष्णाच्या मनावर परिणाम झाला हाेता. या चिंतेत त्याने गळफास लावून घेवून आत्महत्या केली, असे कृष्‍णा अतकरी याच्‍या नातेवाईकांनी सांगितले.

कृष्‍णा रात्री आपल्या घरीच होता. सकाळी ५ वाजेदरम्यान वडील झोपून उठल्यावर ताे घरात नव्‍हता. आई वडिल शेतात गेले असता मुलाने आंब्याच्या झाडाला गळफास लावल्‍याचे दिसून आले. त्‍यानंतर सदर घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. मृत शेतकरी कृष्णा यांचे वडील शालिकाराम परशराम अतकरी (वय ७०) यांचे माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीपकुमार घरडे करीत आहेत.

Back to top button