वर्धा अपघात : भरधाव कारची पाणीपुरीच्या स्‍टॉलला धडक; १ ठार, ५ जण जखमी

वर्धा अपघात : भरधाव कारची पाणीपुरीच्या स्‍टॉलला धडक; १ ठार, ५ जण जखमी

वर्धा ; पुढारी वृत्तसेवा रस्‍त्‍याकडेला पाणीपुरी खात असलेल्‍यांना तसेच कारमध्ये पाणीपुरी खात बसलेल्‍यांच्या उभ्‍या कारला भरधाव कारने जबर धडक दिली. यावेळी भरधाव कारने पाणीपुरीच्या हातगाडीलाही फरफटत नेले. वर्धा ते सावंगी मार्गावरील भीमनगर परिसरात हा विचित्र अपघात (शुक्रवार) रात्री घडला. या अपघातात १ जण ठार तर पाच व्यक्‍ती गंभीर जखमी झाल्या आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, शहरातील सावंगी (मेघे) मार्गावर भीमनगर परिसरात आंबेडकर शाळेजवळ रस्त्याच्या कडेला विजयसिंग बघेल यांचे कृष्णा पाणीपुरी भेळ सेंटर आहे. या ठिकाणी (शुक्रवार) रात्री काहीजण पाणीपुरी खात होते. यावेळी अतुल घोरपडे, त्यांची पत्नी प्रतिक्षा घोरपडे हे दाम्पत्य पाणीपुरी खाण्यासाठी थांबले होते. दोघेही कारमध्येच बसून पाणीपुरीचा आस्वाद घेत होते. यावेळी सुनील भगत, त्यांची पत्नी मनीषा भगत आणि मुलगा सक्षम भगत हे तिघे रस्त्याकडेला उभे राहून पाणीपुरी खात होते.

या दरम्यान, अचानक राजू चंपत पाटील (वय २७) रा. समतानगर याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवून पाणीपुरीच्या दुकानाजवळ असलेल्या कारला मागून जबर धडक दिली. कारने रस्त्याकडेला फुटपाथवर असलेल्या पाणीपुरीच्या हातगाडीला दुर अंतरावर फरफटत नेले. यावेळी पाणीपुरी खात असलेल्यांनाही कारने चिरडले. अपघातानंतर भरधाव कार रस्त्याच्या कडेला जावून पलटी झाली. या भीषण अपघातात अतुल घोरपडे यांचा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची पत्नी प्रतिक्षा यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

या अपघातात जखमी पाणीपुरी विक्रेता विजयसिंग बघेल हा बेशुद्ध असून, त्‍यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. मनीषा भगत, मुलगा सक्षम भगत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुनील भगत किरकोळ जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चमूसह अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठविले. आरोपी कारचालका विरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news