

भंडारा ; पुढारी वृत्तसेवा तुमसर तालुक्यातील बघेडा शिवारात वाघाच्या शिकारीचे प्रकरण ताजे असतानाच उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यातील पवनी वनपरिक्षेत्रात पुन्हा एका वाघिणीच्या बछड्याचा शव सापडल्याने वन्यजीव विभागात खळबळ उडाली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली.
उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्यातील पवनी वनपरिक्षेत्रात सध्या वाघ आणि वाघिणींची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच या अभयारण्यात भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अभयारण्यात पर्यटकांना हमखास वाघ दिसत असल्याने हे अभयारण्य पर्यटकांच्या विशेषत: वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
पवनी वनपरिक्षेत्रात वन्यजीव क्षेत्रात 'श्याडो' ही वाघिण आपल्या तीन बछड्यांसोबत नेहमीच पर्यटकांना दिसायची. दरम्यान, २ एप्रिल रोजी सफारीदरम्यान या वाघिणीचे दोनच बछडे दिसून आल्याने वन्यजीव विभागातर्फे शोधमोहिम सुरू करण्यात आली होती. ४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास या बछड्याचा शव कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या शरिरावर जखमेच्या खुणा आढळून आल्याने हिंस्त्र प्राण्याने विशेषत: बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बछड्याचे वय अंदाजे ९ महिने असून, त्याचे शरिर कुजलेले असल्याने तो नर की मादा याबाबत संभ्रम आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी अन्नबटूला, उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. गुणवंत भडके, डॉ. हटवार, नागपूरचे मानद वन्यजीव रक्षक रोहीत कारु, भंडाराचे शाहिद खान, नदीम खान, वन्यजीव संस्थेचे अजहर हुसैन, मंगेश मस्के, सुभाष कोरे, तेजस पारशीवनीकर, नाहीद खान आदींनी घटनास्थळी भेट दिली.