नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात भूमिका घेणारे अॅड. सतीश उके यांच्या घरी 'ईडी'ने गुरुवारी छापे टाकत त्यांच्यासह त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना 'मनी लाँडरिंग'च्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली.
गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास 'ईडी'च्या पथकाने पार्वतीनगरातील अॅड. उके यांच्या घरी छापे टाकले. अॅड. उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील म्हणून काम करत असून, त्यांनी भाजप नेत्यांच्या नाकी नऊ आणले होते. तेच त्यांना भोवल्याचे बोलले जाते.
काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार दिली होती. अॅड. उके नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एका दुसर्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना नेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. 'ईडी'ने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
न्या. लोया मृत्यूप्रकरणी अॅड. उके त्यांनी सनसनाटी आरोप करीत अनेक महत्त्वाचे दावे केले होते. अॅड. उके यांनी भाजप नेत्यांविरोधात आरोपही केले होते. फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेला गुन्हा लपवला असल्याची तक्रार अॅड. उके यांनी केली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.
फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी अॅड. उके यांनी केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले यांनी दाखल केलेल्या याचिकेत अॅड. उके त्यांचे वकील आहेत. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अॅड. उकेंनी नकली मोदीला पत्र परिषदेत सादर केले होते, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चुलत मावसभावाला पत्र परिषदेत सादर करीत त्यांच्यावर आरोप केले होते.
पुरावे नष्ट करण्यासाठी छापे : प्रदीप उके
आमच्याकडील पुरावे नष्ट करण्यासाठी 'ईडी'ने छापे घातले असल्याचा आरोप अॅड. उके यांचा भाऊ प्रदीप उके याने पत्रकार परिषदेत केला आहे. अॅड. उके यांनी फडणवीस यांच्याविरोधात अनेक खटले दाखल केले आहेत. एका प्रकरणाचा निकाल चार दिवसांत लागणार होता. त्यासाठी त्यांनी अॅड.उके यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला आणि कागदपत्रांची पाहणी केली. फडणवीसांविरोधातील पुरावे नष्ट करण्यासाठी 'ईडी'ने छापे घातले. कारण, लॅपटॉपमध्ये फडणवीस यांच्याविरुद्धच्या खटले तसेच न्यायाधीश लोया प्रकरण आणि निमगडे केसचे पुरावे होते. फडणवीस यांच्याकडून काही लोकांनी पैशाचे आमिष दाखवले होते. आमच्याकडे असलेले पुरावे ते नष्ट करतील, अशी भीती प्रदीप उके यांनी व्यक्त केली आहे.