भंडारा येथील कोका अभयारण्यात वाघिणीचे दर्शन, कॅमेरात टिपले छायाचित्र | पुढारी

भंडारा येथील कोका अभयारण्यात वाघिणीचे दर्शन, कॅमेरात टिपले छायाचित्र

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : तब्बल दोन वर्षानंतर वन्यप्रेमींना भंडारा शहरालगत असलेल्या कोका अभयारण्यात टी१६ वाघिणीचे दर्शन झाले. त्यामुळे वन्यप्रेमींमध्ये खुशीची लहर उमटली आहे. दोन वर्षाआधी टी-१० म्हणजेच मस्तानी ही वाघीण आपल्या बछड्यांसोबत कोका वन्य भ्रमंतीला जाणाऱ्या पर्यटकांना नेहमीच दिसायची. कोरोनाचा काळ व नंतर मागील दोन वर्षात कोका अभयारण्यात वाघिणीचे दर्शन होत नव्हते. यामुळे कोकाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

नुकतीच भंडारा येथील वन्यप्रेमी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर दीपक चड्डा नुकतेच जंगल सफारीला गेले असता त्यांना टी-१६ या वाघिणीचे दर्शन झाले. कोका वन्यजीव अभयारण्यात टी-१३ हा नर वाघ नेहमीच दिसून येतो. पण पहिल्यांदाच कोका येथे टी-१६ वाघिणीला आपल्या कॅमेरात दीपक चड्डा यांनी टिपले आहे.

पर्यटकांना झालेले टी-१६ चे दर्शन ही आनंदाची पर्वणी ठरली असून कोका वन्यजीव अभयारण्यात सफारीला आता सुगीचे दिवस येतील, अशी आशा इथल्या निसर्गप्रेमी व गाईड लोकांनी व्यक्त केली आहे. टी-१६ वाघिणीसोबत बछडे असून येणाऱ्या काळात वन भ्रमंती करणाऱ्यांना नक्कीच या व्याघ्र परिवाराचे दर्शन घडून येईल, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button