अमरावती : कुष्ठा गावात शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू | पुढारी

अमरावती : कुष्ठा गावात शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुष्ठा गावालगत असलेल्या एका शेतातील शेततळ्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. कुष्ठा गावात 11 वर्षीय मुलगी शेतातळ्यानजीक खेळत असताना पाण्यात पडली. या मुलीला वाचवण्यासाठी गेलेला 25 वर्षीय युवकसुद्धा त्या तळ्यात बुडाला.

ही घटना रविवारी (13 मार्च) सायंकाळी घडली. या दोघांचाही पोलिस व गावकऱ्यांनी रविवारी रात्रीपर्यंत शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. अंधार झाल्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

हर्षाली विनोद वांगे (11, रा. कुष्ठा) असे शेत तळ्यात पडलेल्या मुलीचे तर बाजीलाल कास्देकर (25, कुष्ठा) असे मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या युवकाचे नाव आहे. दोघांचाही  मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

कुष्ठा गावालगतच हरिभाऊ नाथे यांचे शेत आहे. नाथे यांच्या शेतात शेततळे आहे. या शेततळ्याजवळ हर्षाली दुपारी खेळण्यासाठी गेली होती. दरम्यान, खेळत असतानाच पाय घसरुन हर्षाली शेत तळ्यात पडली. यावेळी नाथे यांच्या शेतातच काम करणारा युवक बाजीलाल कास्देकर याने हर्षालीच्या बचावासाठी शेत तळ्यात उडी घेतली.

मात्र, बराच वेळ होऊनही हर्षाली, बाजीलाल बाहेर आले नाही. ही माहिती गावकऱ्याना मिळताच शेततळ्याजवळ गावकऱ्यांची गर्दी झाली. या घटनेची माहिती पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव यांना देण्यात आली. त्यामुळे पथ्रोट पोलिससुद्धा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी व पोलिसांनी या दोघांचाही पाण्यात शोध सुरू केला, मात्र, रविवारी रात्रीपर्यंत हर्षाली किंवा बाजीलाल हे पाण्यात सापडले नव्हते.

हेही वाचा

Back to top button