थकीत वीज बिल भरा अन्यथा अंधाराचा सामना करा : डॉ. नितीन राऊत | पुढारी

थकीत वीज बिल भरा अन्यथा अंधाराचा सामना करा : डॉ. नितीन राऊत

अकोला; पुढारी वत्तसेवा : कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडीत वीज पुरवठा करण्यात आला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची आम्हाला कल्पना आहे. पण जर वीज वापरली असेल तर येणाऱ्या देयकाचे पैसे भरावेच लागतील. ते ग्राहक वीज बिल भरणार नाहीत अशा कुटूंबांना अंधाराचा सामना करावा लागेल. ही बाब टाळायची असेल तर वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते महावितरणकडून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत उभारण्यात आलेल्या बाळापूर तालुक्यातील कळंबा कसुरा, अकोट तालुक्यातील मुंडगाव आणि वडाळी देशमुख येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी महावितरणच्या स्थितीबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले, वापरलेल्या वीजेचे पैसे भरणे आपले कर्तव्य आहे. महावितरणला देखील बाहेरून पैसे देऊन वीज खरेदी करावी लागते. वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्याने महावितरण आर्थिक संकटात आहे. अशीच थकबाकी वाढल्यास आगामी काळात राज्यातील जनतेला पुन्हा एकदा भारनियमनास समोर जावे लागेल, असा धोकाही ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केला.

5 एमव्हीए क्षमतेचे प्रत्येकी एक रोहित्र उभारण्यात आले आहे. नवीन वीज उपकेंद्रामुळे 36 गावातील सुमारे 4 हजार वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. याशिवाय बाळापूर तालुक्यातील कळंबा कसुरा येथील वीज उपकेंद्रांमुळे कळंबा खुर्द आणि बुद्रुक, सोनगिरी, कसुरा या गावातील 1475 वीज ग्राहकांना लाभ होणारा आहे. तसेच कारंजा रंजनपूर वीज उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील वीज उपकेंद्रांमुळे मुंडगाव अमीनपूर, लोहारी बुद्रुक, लोहारी, चिंचखेड,नवरी खुर्द आणि बुद्रुक, आलेगाव,पिंपरी, डिक्कर, देवरी, देवरी फाटा, आलेवाडी, सोनबर्डी आदींसह 28 गावातील वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.

या वीज उपकेंद्रांमुळे अकोट एमआयडीसी आणि अकोट 132 कि. व्हो वीज उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. वडाळी देशमुख येथील वीज उपकेंद्रांमुळे शिरसोली, मालपुरा आणि मालठाणा या गावातील वीज ग्राहकांना लाभ होणार असून सावरा आणि पणज वीज उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व्यासपीठावर महावितरणचे अकोला मंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट, प्रमोद डोंगरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर, काँग्रेस अनुसूचित विभागाचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र करवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Back to top button