चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसात तिघांचा वाघाच्या हल्ल्यात बळी | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसात तिघांचा वाघाच्या हल्ल्यात बळी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतात काम करीत असलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला ( tiger attack ) करून पन्नास मीटरपर्यंत ओढत नेत तिला ठार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 18) मूल तालुक्यातील कोसंबी येथील शेतात घडली. ज्ञानेश्वरवी वासुदेव मोहुरले (वय 55) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसात तिघांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने जिल्हा चांगलाच हादरला आहे.

मुल तालुक्यातील मौजा कोसंबी येथील शेतकरी महिला ज्ञानेश्वरी वासुदेव मोहूर्ले या स्वत:च्या शेतात दैनंदिन कामासाठी जात असत. नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतात काम करीत असताना मागून वाघाने अचानक हल्ला ( tiger attack ) केला. मानेला पकडून पन्नास मीटरपर्यंत ओढत नेले. या हल्यात ज्ञानेश्वरी मोहूर्ले यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच सरपंच रवींद्र कामडी, पोलीस पाटील अर्चना मोहूर्ले, सारिका गेडाम व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मूल पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार सतिशसिंह राजपूत, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, क्षेत्र सहाय्यक प्रशांत खणके, वनरक्षक राकेश गुरनुले, वनरक्षक मरसकोल्हे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. मूल वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी मृतकांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणुन तीस हजार रुपये आर्थिक मदत दिली.

जिल्ह्यात तीन दिवसात तिघांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने जिल्हा हादरला आहे. बुधवारी रात्री भोजराज मेश्राम, गुरूवारी राज भडके (वय 16) या मुलाचा आणि शुक्रवारी ज्ञानेश्वरी मोहूर्ले या महिला वाघांच्या बळी ठरल्या आहेत.

Back to top button