मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफान हल्ला चढवला. कालपर्यंत माझे निकटवर्तीय माझ्या घरावर चालून येत होते. एवढे सगळे सहन करून मी हिमतीने आणि जिद्दीने उभा आहे. (Maharashtra Politics)
त्यामुळे आता राजकारणात एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन, असा निर्वाणीचा इशारा ठाकरेंनी फडणवीस यांना दिला. आज माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही; पण मी फक्त शिवसैनिकांच्या हिमतीवर आणि भरवशावर त्यांना आव्हान देत आहे.
शिवसैनिकांमुळेच दिल्लीच्या छातीत धडकी भरली आहे, असे ठाकरे म्हणाले. कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची वृत्ती सोडू नये. कोणी हात उगारला तर तो उगारलेला हात जागेवर ठेवायचा नाही, असा आदेशच ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांना दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता.
शिवसेना नेते दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, अॅड. अनिल परब, अनंत गिते, विनायक राऊत आदी नेतेमंडळी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या इशाऱ्यामुळे ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आपले हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा हे हिंदुत्व नाही. हे लोक आग लावायचे धंदे करतील.
काही जणांना फोनही येत असतील हा गेला, तो गेला; पण जायचे असेल तर उघडपणे जा, दगाबाजी करून जाऊ नका, पैसे मिळत आहेत म्हणून आपल्या आईशी गद्दारी करू नका. नगरसेवक, माजी नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत.
जे जाणार आहेत त्यांनी आताच चालू पडा, असे ठाकरे यांनी ठणकावले. जे माझ्यासोबत राहतील ते माझे आणि समोर येतील ते माझे शत्रू आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी मला जोडून दिलेल्या शिवसैनिकांना सोबत घेऊन मी लढाई जिंकून दाखवीन, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये जमीन शिल्लक नसून मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर केला.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण सर्वांनी घाम फोडला. शिवसैनिकांमुळेच दिल्लीच्या छातीत धडकी भरली होती, असे कौतुकोद्गार काढत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतही पंतप्रधानांना प्रचाराला येण्याचे आवाहन केले. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही महायुतीचा पराभव होईल. मोदींच्या प्रचारसभांचा जनतेवर काहीच परिणाम होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदींची खिल्ली उडवली.
तुम्हाला दिलेल्या सूचना तुम्ही पाळणार असाल तर मैदानात उतरा. ही लढाई आहे, रणांगण आहे. मर्द असाल तर रणांगणात उत्तरा, नाही तर काठावर बसून लढाई बघा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.