

Uddhav Thackeray Flight Meeting CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नागपूरकडे जाताना एकाच विमानातून प्रवास केला. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर यवतमाळ दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी या भेटीबाबत प्रथमच भाष्य करत, "मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा झाली असून त्याबाबतचे तपशील येत्या काही दिवसांत समोर येतील," असे सूचक विधान केले.
सध्या उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासोबतच पत्रकार परिषदेत अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर टीका करताना सांगितले की, संबंधित खासदारांच्या निवडणूक प्रचारासाठी त्यांनी स्वतः दौरे केले होते आणि मतदारांनी शिवसेना व शिवसेना प्रमुखांवरील विश्वासामुळे त्यांना निवडून दिले होते.
त्यांनी दावा केला की, निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करून काही खासदारांनी पक्ष सोडला. आमदारांच्या फुटीनंतर "५० खोके"ची चर्चा झाली होती, त्याच धर्तीवर खासदारांना किती निधी मिळाला असेल, याचा जनतेने विचार करावा, अशी टीकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी काही बंडखोर नेत्यांच्या वक्तव्यांवरही नाराजी व्यक्त केली. पत्रकार आणि शिवसैनिकांशी असभ्य वर्तन महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे सांगत त्यांनी सभ्य राजकारणाची गरज अधोरेखित केली. तसेच, पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या शिवसैनिकांची भेट घेण्यासाठी आणि मतदारांशी संवाद साधण्यासाठी आपण हा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या विमान प्रवासात नेमकी कोणती चर्चा झाली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, "आमच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली आहे. त्यातून काय ठरलं, हे योग्य वेळी सर्वांसमोर येईल."
त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात काही नवीन घडामोडी घडणार का, याबाबत राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकारवर टीका करत, हमीभावाचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसताना पक्षांतर करणाऱ्यांना मात्र 'हमीभाव' मिळत असल्याची उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
या सर्व विधानांमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, उद्धव ठाकरे यांच्या सूचक वक्तव्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.