Raj Thackeray: 'संघाची स्तुती करायची असेल तर आधी राजीनामा द्या'; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटलांवर घणाघाती टीका

Raj Thackeray Vishwas Nangare Patil: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या RSSच्या कार्यक्रमातील भाषणावरून टीका केली आहे.
Raj Thackeray Vishwas Nangare Patil
Raj Thackeray Vishwas Nangare PatilPudhari
Published on
Updated on

Raj Thackeray Vishwas Nangare Patil: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमातील भाषणावरून टीका केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने कोणत्याही वैचारिक किंवा सामाजिक संघटनेप्रती सार्वजनिक निष्ठा व्यक्त करणे योग्य नसल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारलाही याबाबत प्रश्न विचारले आहेत.

राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पोलीस अधिकाऱ्याची निष्ठा ही केवळ संविधान, कायदा आणि पोलीस दलाच्या कर्तव्याशी असली पाहिजे. मात्र, विश्वास नांगरे पाटील यांनी एका हिंदू संमेलनात उपस्थित राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या संस्थापकांविषयी गौरवोद्गार काढल्याने त्यांच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी संबंधित हिंदू संमेलने जरी अराजकीय असल्याचे सांगितले जात असले, तरी ती प्रत्यक्षात राजकीय स्वरूपाची असल्याचा दावा केला. अशा कार्यक्रमात सरकारी सेवेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभागी होणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे म्हटले की, जर एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या संघटनेबद्दल वैचारिक जिव्हाळा असेल, तर तो वैयक्तिक पातळीवर ठेवावा. सार्वजनिकपणे अशी भूमिका घ्यायची असेल, तर आधी सरकारी सेवेचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर संबंधित संघटना किंवा राजकीय पक्षात प्रवेश करावा.

Raj Thackeray Vishwas Nangare Patil
Vishwas Nangare Patil: IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्याचा व्हिडिओ व्हायरल

राज ठाकरे यांनी सरकारवरही निशाणा साधत, अशा प्रकारच्या कृतीबाबत सरकारची भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला. "आज ही भूमिका मान्य केली जात असेल, तर भविष्यात दुसऱ्या कोणत्याही विचारसरणीच्या कार्यक्रमात एखादा अधिकारी सहभागी झाला, तर त्यालाही हेच निकष लागू होतील का?" असा सवाल त्यांनी केला.

यावेळी त्यांनी 2012 मधील एका घटनेचाही उल्लेख केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चादरम्यान एका पोलीस कॉन्स्टेबलने पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केल्यामुळे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे उदाहरण देत, त्याच निकषांचा वापर आता केला जाणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षांची संख्या कमी होत असताना सरकारी अधिकारीदेखील जर निष्पक्ष राहिले नाहीत, तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा कोणावर, असा प्रश्न निर्माण होतो.

शेवटी त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांना उद्देशून, "तुम्ही एक सक्षम आणि कार्यक्षम अधिकारी आहात. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेसमोर आपल्या निष्पक्षतेशी तडजोड करू नका," असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news