

Uddhav Thackeray Slams Ajit Pawar: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापत असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. अजित पवारांनी नुकत्याच केलेल्या विधानात म्हटले होते की, “शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं, मग परतफेड का करत नाही? एकदा कर्जमाफी दिली, आता आम्हालाही निवडून यायचं होतं म्हणून आम्ही बोललो.” या विधानावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
सध्या उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी पैठण तालुक्यातील नांदर गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले “कर्जमाफी करायच्या आधी माती तर द्या. शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन गेली, पिकं वाळली, आणि सरकार पंचांग काढतंय, मुहूर्त ठरवतंय. दिवाळी झाली, तुळशीचं लग्नही झालं, पण मदत अजूनही मिळाली नाही.”
ठाकरे म्हणाले. “अजित पवार म्हणतात आम्ही जिंकण्यासाठी कर्जमाफी केली. म्हणजे काय? निवडणुकीसाठी शेतकऱ्यांची आशा वापरली? तुम्ही शेतकऱ्यांना म्हणता हातपाय हलवा, पण तुम्ही काय हलवत आहात?”
उद्धव ठाकरेंनी सरकारवर आरोप केला की, महायुतीने कर्जमाफीचा फक्त दिखावा केला, पण प्रत्यक्षात मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली नाही. जूनपर्यंत थांबा, असं सांगून सरकार वेळ मारून नेत आहे. पण आम्हाला जूनची मुदत मान्य नाही. शेतकरी आत्ताच संकटात आहे, त्याला आत्ताच मदत हवी. निवडणुकीसाठी नव्हे तर जगण्यासाठी कर्जमुक्ती करा.”
ठाकरे म्हणाले की, शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. आता त्याला उभं राहण्यासाठी मदत मिळाली नाही, तर तो परत कधीही सावरू शकणार नाही. निवडणुकीच्या घोषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीने शेतकऱ्याला आधार द्या, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.