

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही, असा गजर सिडको घेराव आंदोलनात सीबीडी बेलापूर येथे झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय समिती, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचा जनसागर उसळला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी शुक्रवारी सिडको विरोधात घेराव आंदोलन झाले. साडेबारा टक्क्यांचा कायदा दिबा पाटील यांच्यामुळेच अस्तित्वात आला.
त्यामुळे एकवेळ भूगोल बदलेल पण इतिहास बदलणार नाही. अशी जोरदार गर्जना करत दिबासाहेबांचा जयजयकार संपूर्ण आसमंतात दुमदुमला होता. घेराव आंदोलन म्हणजे असंतोषाची एक ठिणगी होती त्याचा वणवा होण्याआधी सिडको व राज्य सरकारने भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे.
दिबांचे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाकडून सांगण्यात आले. बेलापूर सीबीडी येथील क्रोमा इलेक्ट्रॉनिक्स येथून सकाळी साडेदहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर हे भूमिपुत्रांचे वादळ सिडको भवनाजवळ धडकले.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, पनवेल महापौर कविता चौतमोल यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय समित्या, भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होत.